एटीएम न्यूज नेटवर्क ः उन्हाच्या झळा सुरू झालेल्या असतानाच पावसाला पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे धुळे, नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात वादळी पाऊस झाल्याने कांदा, द्राक्ष, गहू, हरभरा, आंबा, केळी बागांना फटका बसला आहे.
राज्यातील अनेक भागात तापमान ३७ अंशापर्यंत वाढल्यामुळे उन्हाच्या झळा असह्य होऊ लागल्या आहेत. त्यातच पावसाला पोषक वातावरण निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
नाशिक जिल्ह्यात अनेक ठिकाणी सोमवारी पहाटे वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने झोडपून काढले. वादळी वाऱ्यामुळे गहू, हरभऱ्याचे पीक आडवे झाले आहेत. जिल्ह्यात द्राक्षे काढणीला आली असून, पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे.
दक्षिण कोकण ते उत्तर मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. उत्तर गुजरात आणि नैऋत्य राजस्थान परिसरावर चक्राकार वारे वाहत असल्यामुळे राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
राज्यातील नाशिक, नगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, बुलडाणा, अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया या राज्यांमध्ये वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.