एटीएम न्यूज नेटवर्क ः साखरेप्रमाणे महाराष्ट्रातील कांदा निर्यातीसाठी केंद्र सरकारने दीर्घकालीन धोरण निश्चित करावे. दरवर्षी खरीप व रब्बी हंगामातील किमान ३० ते ३५ लाख टन कांदा निर्यात करण्यासाठी पावले उचलावीत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संपर्कप्रमुख कुबेर जाधव यांनी केले आहे.
पैठण येथे खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राज्य कार्यकारिणी बैठक झाली. त्या वेळी कांद्याचे उत्पादन व कांद्याला मिळणारा कवडीमोल भाव या विषयावर कुबेर जाधव यांनी मार्गदर्शन केले.
राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शिंदे-फडणवीस सरकारचे लक्ष नाही. दिवसा वीज, शेतीपंपाचे वाढीव प्रस्तावित वीज दर, ऊस तोडणी मुकादमाकडून होणारी लूट, कापूस, थकीत उसाची एफआरपी, कांद्याचे घसरलेले दर, मका, पीक विमा, अतिवृष्टीची भरपाई, तसेच प्रोत्साहनपर अनुदानाची थकीत रक्कम आदी प्रश्नांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने २२ फेब्रुवारी रोजी राज्यभर चक्का जामआंदोलन करण्यात येईल, अशी घोषणा खासदार राजू शेट्टी यांनी केली.
बुलढाणा येथील शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर विनाकारण लाठीहल्ला करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करावी, अशी मागणी देखील त्यांनी केली.
या वेळी स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. जालंधर पाटील, संदीप जगताप, प्रकाश बालवडकर,भाऊसाहेब थोरात, अमर कदम, पूजा मोरे, गजानन बंगाळे पाटील, प्रशांत डिक्कर, रवी इंगोले, माऊली मुळे, कुबेर जाधव, राजेंद्र शिरसाठ, निवृत्ती गारे, भाईदास चौधरी यांच्यासह राज्यभरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.