एटीएम न्यूज नेटवर्क ः स्वित्झर्लंडमधील दावोस या लोकप्रिय शहरात आयोजित करण्यात आलेल्या जागतिक आर्थिक मंच -2023 मध्ये भारताने सक्रिय सहभाग घेतला. भारतातील ड्रोन स्टार्टअप कंपनी गरुडा एरोस्पेसने जागतिक आर्थिक मंचाच्या इंडियन सस्टेनेबिलिटी लाउंजमध्ये प्रथम कार्बन न्यूट्रल ड्रोनचे अनावरण केले.
अनावरण झाल्यानंतर गरुडा एरोस्पेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी अग्निश्वर जयप्रकाश म्हणाले, नागरी हवाई वाहतूक संचालनालयाने मान्यता दिलेले गरुडा एरोस्पेसचे मेड इन इंडिया कार्बन न्यूट्रल ड्रोन सादर करताना आनंद होत आहे. उद्योग जगातील दिग्गज कंपन्या, जागतिक नेते आणि धोरणकर्त्यांसोबत अनुभव कथन करणे हा एक मोठा सन्मान आहे.
जागतिक आर्थिक मंचाच्या इतर अजेंड्यांमध्ये स्टार्टअप आणि गुंतवणूक हे प्रमुख आहेत. कार्बन न्यूट्रल ड्रोनचे प्रक्षेपण देखील जागतिक आर्थिक मंचाच्या हवामान कृती उद्दिष्टांशी सुसंगत आहे. प्रगतीशील सरकारी धोरणे आणि स्टार्टअप समुदाय 2030 पर्यंत भारताला ‘ग्लोबल ड्रोन हब’ मध्ये कसे बदलेल यावर त्यांनी प्रकाश टाकला.
गरुडा एरोस्पेस पुढील 15 महिन्यांत 25,000 ड्रोन तयार करणार असून, कृषी क्षेत्रात क्रांती घडवून आणणार आहे. कृषी हरित क्रांती 2.0 ची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतभरातील 100 गावांमध्ये 100 किसान ड्रोन दाखविल्यानंतर झाली. यामुळे भारतातील तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत.
शेतकरी उच्च क्षमतेच्या किसान ड्रोनचा वापर करून फळे, भाजीपाला आणि फुले यांसारखी उत्पादने कमीत कमी वेळेत बाजारपेठेत पोहोचवू शकतात आणि त्यांचे उत्पन्न वाढवू शकतात. उद्घाटन करताना पंतप्रधानांनी हरियाणातील मानेसर येथे शेतकऱ्यांना संबोधित केले. किसान ड्रोन यात्रेला हरियाणातील गुडगावमधील मानेसर येथून हिरवा झेंडा दाखवण्यात आला.