एटीएम न्यूज नेटवर्क : किसान रेलने राज्यातील शेतकऱ्यांसाठी संधी निर्माण केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी इतर राज्यांतील नवीन बाजारपेठांची दारे खुली झाली आहेेत. याला केवळ शेतकऱ्यांकडूनच नव्हे, तर ग्राहकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. किसान रेलमुळे शेतमालाला चांगला भाव मिळाला तसेच ग्राहकांना वाजवी दरात शेती उत्पादन उपलब्ध झाले, असे खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले.
ते म्हणाले, की “ केंद्र सरकार किसान रेल पुन्हा सुरू करण्याचा विचार करत असल्याने शेतकर्यांना वाहतूक अनुदान देण्याचाही विचार करायला हवा. यामुळे शेतकऱ्यांना केवळ वाहतूक खर्च कमी करण्यास मदत होणार नाही, तर शेती व्यवसायाला चालना मिळेल. यामुळे अधिक शेतकऱ्यांना त्यांच्या मालाची देशभरात वाहतूक करण्यास आणि नवीन बाजारपेठा निर्माण करण्यास प्रोत्साहन मिळेल.
वर्ष 2020-21 च्या अर्थसंकल्पीय घोषणेची अंमलबजावणी करण्यासाठी किसान रेल आणि कृषी उडानवर एक समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीने सविस्तर चर्चा आणि संकल्पना तयार करण्यासाठी कार्यकारी संचालक, रेल्वे मंडळाच्या निमंत्रकांच्या नेतृत्वाखाली एक उपसमिती स्थापन केली आहे.
कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाशी चर्चा केल्यानंतर रेल्वे मंत्रालयाने नाशवंत फलोत्पादन/कृषी उत्पादने, दुग्धव्यवसाय, मत्स्यपालन यांच्या वाहतुकीसाठी किसान विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. या गाड्या बहुवस्तू, बहु मालवाहू सेवा असून, सर्व प्रमुख स्थानकांवर वेळेनुसार धावतात.
नाशवंत शेती / फलोत्पादन उत्पादने, दुग्धव्यवसाय, मत्स्यपालन यांच्या वाहतुकीसाठी 7 ऑगस्ट 2020 रोजी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि तत्कालीन रेल्वे, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते देवळाली (नाशि, महाराष्ट्र) ते दानापूर (बिहार) या पहिल्या किसान रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला होता.
28 डिसेंबर 2020 रोजी सांगोला (महाराष्ट्र) ते शालिमार (पश्चिम बंगाल) या मार्गासाठी किसान रेल्वेच्या 100 व्या सेवेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला होता.
सध्या किसान रेल गाड्यांच्या एकूण 167 मार्गांवर 2359 फेऱ्या चालवण्यात येत आहेत. यामध्ये जवळपास 7.9 लाख टन मालाची वाहतूक करण्यात आली आहे. किसान रेलचे मार्ग शेतकरी आणि इतर भागधारकांच्या मागणीनुसार ठरवले जातात. जेव्हा जेव्हा एखाद्या विशिष्ट मार्गासाठी किसान रेलची मागणी प्राप्त होते, तेव्हा प्रस्तावित मार्गाचे परिचालन, व्यवहार्यतेचा योग्य विचार करून किसान रेलच्या संचालनासाठी संबंधित विभागीय रेल्वे विभागांकडून व्यवस्था केली जाते.