एटीएम न्यूज नेटवर्क : राष्ट्रीय ग्रामीण विकास बँक (नाबार्ड)च्या सहकार्याने कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग नवउद्यम (स्टार्ट अप) आणि कृषी उद्योजनकसाठी ग्रामीण उपक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी ७५० कोटी रुपयांचा 'अॅग्रीशुअर'' फंड जाहीर करण्यात आला आहे.
८५ स्टार्टअपला प्रत्येकी २५ कोटी
भारताच्या कृषी क्षेत्रात नावीन्य आणि शाश्वततेला चालना देणे या उद्देशाने या अंतर्गत ७५० कोटी रुपयांच्या पर्यायी गुंतवणूक निधीची स्थापना करण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत ८५ स्टार्टअपला प्रत्येकी २५ कोटी रुपये देण्यात येणार आहेत.या उपक्रमांसाठी २५० कोटी रुपये नाबार्ड आणि कृषी मंत्रालयाकडून, तर २५० कोटी रुपये इतर संस्थांकडून देण्यात येणार आहेत.
'अॅग्रीशुअर'' फंडाचे उद्दिष्ट
कृषी क्षेत्रातील नावीन्यपूर्ण, तंत्रज्ञानावर आधारित उपक्रमांना चालना देणे, शेती उत्पादन साखळी वाढविणे, ग्रामीण भागात पायाभूत सुविधा निर्माण करणे, रोजगार निर्मिती करणे आणि शेतकरी उत्पादक संस्थांना पाठिंबा देणे, कृषी क्षेत्रामध्ये शाश्वत वाढ आणि विकास करणे हे या फंडाचे उद्दिष्ट आहे, असे कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे सहसचिव अजित कुमार साहू यांनी सांगितले.
कृषी विभागाचे सहसचिव, नाबार्ड अध्यक्षांची उपस्थिती
मुंबई येथे झालेल्या या कार्यक्रमाला कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे सहसचिव अजित कुमार साहू, नाबार्डचे अध्यक्ष शाजी के. व्ही, नाबार्डचे डीएमडी गोवर्धन सिंग रावत आणि डॉ. अजय कुमार सूद यांची उपस्थिती होती.
तंत्रज्ञानाची महत्वपूर्ण भूमिका
नाबार्डचे अध्यक्ष शाजी के.व्ही. म्हणाले कि, शेतकरी हा कृषी मूल्यांचा पाया आहे. केवळ कर्जपुरवठा करून कृषी क्षेत्रातील समस्या सुटणार नाहीत नवोन्मेषातून पुढच्या स्तराचा विकास होईल आणि त्यासाठी सार्वजनिक आणि खाजगी संस्थांनी सहभागीदारी करणे आवश्यक आहे. ते पुढे म्हणाले कि
आपले बहुतेक शेतकरी अल्पभूधारक आहेत. उत्पादकता वाढवण्यावर भर देणे आवश्यक असून त्यासाठी तंत्रज्ञान महत्वपूर्ण भूमिका बजावू शकते या निधीच्या सहाय्याने नवउद्यमांना पाठिंबा देण्याचे आमचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले