एटीएम न्यूज नेटवर्क ः भारतात दूूध उत्पादन दरवर्षी सहा टक्क्यांनी वाढत असून, परदेशात भारतीय दूध पोहोचवण्यासाठी बाजारपेठांचा शोध घ्यावा लागणार आहे, असे मत नीती आयोगाचे सदस्य रमेश चंद यांनी व्यक्त केले. इंडियन डेअरी असोसिएशनने (आयडीए) आयोजित केलेल्या 49 व्या डेअरी उद्योग परिषद आणि प्रदर्शनात ते बोलत होते.
रमेश चंद म्हणाले, की एकेकाळी भारतात अमेरिकेपेक्षा कमी दूध उत्पादन होत होते. आज अमेरिकेत जेवढे दूध उत्पादन होते, त्यापेक्षा दुप्पट दूध भारतात उत्पादित होते. 1960 च्या दशकात भारताचा दूधउत्पादनवाढीचा दर सुमारे 1 टक्का होता, परंतु तो दर आता सहा टक्के आहे.
1950-51 मध्ये देशात दरडोई दुधाचा वापर फक्त 124 ग्रॅम प्रतिदिन होता. 1970 पर्यंत हा आकडा प्रतिदिन 107 ग्रॅमवर घसरला. नंतर तो वाढून 2020-21 पर्यंत 427 ग्रॅम प्रतिव्यक्ती इतका झाला. 2021 मध्ये जागतिक दर सरासरी 322 ग्रॅम प्रतिदिन होता.
भारत दरवर्षी 220 दशलक्ष टन दुधाचे उत्पादन करत असून, देशात प्रतिव्यक्ती दुधाचा वापर वाढला आहे. म्हणून आपण देशात उत्पादित करत असलेल्या दुधासाठी बाजारपेठ शोधणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भारताने परदेशात पुरवठा साखळी निर्माण केली पाहिजे, असे ते म्हणाले.
चंद म्हणाले की, भारतीय दुग्धव्यवसाय आणि पशुसंवर्धन दरवर्षी एकूण शेतीच्या वाढीपैकी निम्मे योगदान देत आहे. कृषी क्षेत्राची वाढ 3.2 टक्के आहे, त्यापैकी निम्मा वाटा दुग्धव्यवसाय आणि पशुपालन उद्योगाचा आहे.
डेअरी उद्योगासमोरील आव्हानांची यादी करताना चंद म्हणाले की, प्रति जनावर दूध उत्पादकता, जाती सुधारणे आणि डेअरी उद्योगात रसायनांचा वापर ही दूध उद्योगासमोरील आव्हाने आहेत.
केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला म्हणाले की, जगाची दुग्धव्यवसाय म्हणून उदयास येण्यासाठी भारताने जाती सुधारणे आणि पशु उत्पादकता वाढवण्यावर भर देणे आवश्यक आहे. भारताला जगातील आघाडीचे डेअरी राष्ट्र म्हणून उदयास आणणे हे केंद्र सरकारचे उद्दिष्ट आहे.
27 वर्षांनंतर गुजरातमध्ये होत असलेल्या या तीन दिवसीय परिषदेत भारतातील आणि परदेशातील डेअरी तज्ज्ञ आणि व्यावसायिक, दूध सहकारी संस्था, दूध उत्पादक, सरकारी अधिकारी, शास्त्रज्ञ, धोरणकर्ते आणि योजनाकार, शिक्षणतज्ज्ञ आणि इतर भागधारकांना एकत्र आले आहेत. 'भारतीय डेअरी ते जग: संधी आणि आव्हाने' ही परिषदेची थीम आहे.
(स्रोत ः APEDA)