एटीएम न्यूज नेटवर्क: नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांची महत्त्वाची बैठक दिनांक २२ सप्टेंबर शुक्रवार रोजी सायंकाळी येवला येथील कलंत्री लॉन्स पाटोदा रोड येथे पार पडली. यावेळी जिल्हाभरातून १००० च्या वर व्यापारी या बैठकीला उपस्थित होते केंद्र सरकारने वाढवलेले ४० टक्के निर्यात शुल्क त्याचबरोबर व्यापाऱ्यांना बाजार समितीत व सरकारकडे जाणवत असलेल्या विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली.
शेतकऱ्यांना देखील निर्यात शुल्क वाढवल्याने फटका बसत आहे. दोन तास चाललेल्या कांदा व्यापाऱ्यांच्या बैठकीत व चर्चेत कोणताही तोडगा निघाला नाही. बैठकीतील निष्कर्षातून मागण्या मान्य होईपर्यंत लिलावात सहभागी होऊ नये असा निर्णय बैठकीत एकमुखी घेण्यात आला. अनेकांनी आपापले मते मांडल्यानंतर कुठलाही तोडगा न निघाल्यामुळे बैठक संपली. परंतु कुठलीही तडजोड करणार नसल्याचे व्यापारी यावेळी स्पष्ट केले. शासनाकडे व्यापारी आपला हक्क मागत आहे, शेतकऱ्यांना कुठलाही त्रास देण्याचा मानस नसल्याचे देखील बैठकीत सांगण्यात आले. शेतकरी हितासाठी हा निर्णय घेतला असून व्यापारांकडील कोणताही माल यापुढे लोडिंग होणार नाही असेही सांगण्यात आले.
पणनमंत्र्यांच्या बैठकीमध्ये येत्या 26 तारखेला ठोस आणि कुठलाही मनाप्रमाणे निर्णय झाला नाही तर यापुढे कोणतीही तडजोड केली जाणार नाही असेही स्पष्ट करण्यात आले. शेतकऱ्यांनी देखील आम्हाला सहकार्य करावे असे आवाहन देखील बैठकीतून करण्यात आले.