एटीएम न्यूज नेटवर्क ः नॅनो युरियामुळे येणाऱ्या काळात शेतकऱ्यांची प्रगती होईल तसेच त्यांचे उत्पन्न वाढून त्यांचे भविष्य बदलेल, असा विश्वास केंद्रीय रसायन आणि खतेमंत्री मनसुख मांडविया यांनी व्यक्त केला. उत्तर प्रदेशातील आओनला आणि फुलपूर येथे इफको नॅनो युरिया लिक्विड प्लँटचे उद्घाटन श्री. मांडविया यांच्या हस्ते झाले.
नॅनो युरियाच्या फायद्यांबद्दल बोलताना ते म्हणाले, की नॅनो युरिया हे सर्वोत्कृष्ट हरित तंत्रज्ञान असून, प्रदूषणावर उपाय उपलब्ध करून देते. यामुळे मातीची बचत होते आणि उत्पादनातही वाढ होते. शेतकऱ्यांसाठी हे सर्वोत्तम आहे. सरकारच्या तज्ज्ञ समितीने नॅनो डीएपीला मान्यता दिली आहे. लवकरच ती डीएपीची जागा घेईल. नॅनो डीएपीचा आपल्या शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल आणि ते डीएपीच्या निम्म्या किमतीत उपलब्ध होईल.
शेतकऱ्यांना नॅनो युरिया उपलब्ध करून देण्यासाठी सरकारचे प्रयत्नही मांडविया यांनी अधोरेखित केले. नॅनो युरिया आणण्यामध्ये विविध विभागांकडून मंजुरी मिळणे, शेतकऱ्यांना पटवून देणे, पारंपरिक युरिया लॉबीला सामोरे जाणे आदी आव्हानेही त्यांनी निदर्शनास आणून दिली.
हे पर्यायी खत असल्याचेही मांडविया यांनी सांगितले. ते म्हणाले, की उत्पादकता वाढवण्यासाठी आम्ही वर्षानुवर्षे युरिया आणि डीएपीचा वापर केला. जेव्हा आपण युरिया वापरतो तेव्हा केवळ 35 टक्के नायट्रोजन (युरिया) पिकाद्वारे वापरला जातो. न वापरलेल्या युरियाचा जमिनीवर परिणाम होतो. आज जमिनीची उत्पादकता कमी होत आहे. पीक उत्पादन मर्यादित होत असल्यामुळे पर्यायी खतांकडे जाणे आवश्यक आहे.
इफकोचे अध्यक्ष दिलीप संघानी, इफकोचे उपाध्यक्ष बलवीर सिंग, इफकोचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी उदय शंकर अवस्थी, फुलपूरच्या खासदार केशरीदेवी हे उद्घाटन कार्यक्रमात उपस्थित होते.