एटीएम न्यूज नेटवर्क ः भारतातील जवळपास निम्मी शेतजमीन पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे पिकांचे वेळेवर उत्पादन होण्यासाठी पुरेसा पाऊस महत्त्वाचा आहे. परंतु देशभरात अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकरी हतबल झाला आहे.
संपूर्ण मार्च महिन्यात अवकाळी पावसाने संपूर्ण देशात थैमान घातले असून, काढणीला आलेल्या रब्बी पिकाला जबरदस्त फटका बसला आहे. रब्बी हंगामातील काढणीला आलेल्या तसेच काढणीसाठी तयार असलेल्या पिकांचे मातेरे झाले आहे, असा अहवाल क्रेडिट रेटिंग संस्था क्रिसिलने मार्च 2023 च्या मार्केट इंटेलिजेन्स अँड अॅनालिटिक्समध्ये प्रसिद्ध केला आहे. या आशयाचे वृत्त अॅग्रो पेजेस डॉट कॉमने कृषक जगतच्या हवाल्याने प्रसिद्ध केले आहे.
1 ते 21 मार्च 2023 दरम्यान अवकाळी पाऊस सामान्यपेक्षा 20% अधिक आणि गेल्या चार दिवसात सरासरीपेक्षा 3-4 पट जास्त झाला आहे. 21 मार्च रोजी मध्य भारतात पावसाचे प्रमाण सामान्यपेक्षा 1600% जास्त होते. देशाच्या इतर भागांतही अवकाळीचे पावसाचे प्रमाण कधी-अधिक प्रमाणात आहे.
मध्य भारत
मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्राचा समावेश असलेल्या मध्य भारतात शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. महाराष्ट्रामधील नाशिकमध्ये जवळपास 5-10% कांदा पिकाचे (सध्या काढणी अवस्थेत) नुकसान झाले आहे. ओलाव्यामुळे कांदे सडण्याचा धोका असून, तो टाळण्यासाठी कांद्याची कापणी 8-10 दिवस उशिरा होण्याची शक्यता आहे. तीच परिस्थिती टोमॅटो, डाळिंब, द्राक्षे, भाजीपाल्याची आहे. द्राक्षाच्या उत्पादनात 8-10% घट अपेक्षित आहे. मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये गारपिटीमुळे गव्हाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे गव्हाचे 3-4% उत्पादनाचे नुकसान होऊ शकते. तथापि, प्रामुख्याने केसरसारख्या प्रमुख आंब्याच्या वाणांचे उत्पादन होणाऱ्या जुनागड येथे हलक्या सरी पडल्या असून, त्या पिकासाठी हानिकारक नाहीत.
उत्तर-पश्चिम भारत
पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानचा समावेश असलेल्या उत्तर-पश्चिम भागातही मोठ्या प्रमाणात गव्हाचे पीक घेतले जाते. अवकाळीमुळे या पिकालाही फटका बसला असून, मागील अंदाजांच्या तुलनेत उत्पादनात 4-5% घट होण्याची शक्यता आहे. पिके अद्याप पूर्णपणे पिकलेली नसून, एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कापणीचे नियोजन होते. पावसामुळे प्रक्रियेला विलंब होऊ शकतो. राजस्थानमधील मोहरी पिकाची 70% कापणी झाली असून, उर्वरित पिकाचे नुकसान झाल्याचे अहवालात म्हटले आहे. राजस्थानातील जोधपूर आणि नागौरमध्ये इसबगोल आणि जिरे या दोन्ही बागायती पिकांचे नुकसान झाले आहे. परिणामी जिऱ्याच्या उत्पादनात १०-१५% घट होण्याची शक्यता आहे.
बाजारभाव आणि उपलब्धता
क्रिसिलच्या अहवालानुसार, रब्बी विपणन वर्ष 2023 मध्ये गव्हाच्या किमती गेल्या वर्षीच्या तुलनेत किरकोळ वाढण्याची शक्यता आहे. उपलब्ध साठा आणि निर्यात मागणी कमी झाल्यामुळे धानाचे भाव वाढतील. महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये झालेल्या नुकसानीमुळे कांदा आणि टोमॅटोसारख्या भाज्यांचे भाव वाढण्याची शक्यता आहे. गुजरात आणि बिहारमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची कोणतेही वृत्ते नसल्यामुळे आंब्याचे दर स्थिर असतील. दुसरीकडे, उत्पन्नात घट झाल्याने जिऱ्याचे भाव वाढू शकतात.
उत्तर, ईशान्य, पूर्व भारत
उत्तर आणि ईशान्य भारतात अवकाळी पाऊस भाजीपाला आणि आंब्यासाठी फायदेशीर ठरला असला, तरी बिहारमध्ये गहू आणि लिची फळाच्या पिकांचे नुकसान झाले आहे. पूर्ण बहरलेल्या लिचीच्या बागा अतिवृष्टीमुळे उद्ध्वस्त झाल्या असून, फुलांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे लिचीचे वर्षभरात 5-6% उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. गव्हाच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये भाताचे पिक कमी झाले आहे, तर कूचबिहार आणि जलपाईगुडीमध्ये बटाट्याचे नुकसान झाले आहे. त्यातल्या त्यात बहुतांश बटाट्याची कापणी झाल्याची समाधानकारक बाब आहे. त्यामुळे नुकसान फार मोठे असण्याची शक्यता नाही, असे अहवालात नमूद केले आहे.
दक्षिण भारत
दक्षिण भारतात आंध्र प्रदेश आणि तेलंगणमध्येही अवकाळीचा भात आणि मक्याला फटका बसला आहे. परिणामी परिपक्वतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. दोन्ही पिकांमध्ये सुमारे 3-4% उत्पादन नुकसान अपेक्षित आहे. खरीप हंगामातील मिरची, जी सुकण्याच्या अवस्थेत होती, ती ओलाव्यामुळे सुकण्याची किंवा दर्जा खराब होण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेशातील चित्तूरमध्ये आंबा फळधारणेच्या टप्प्यावर होता, त्याचेही नुकसान झाले आहे. यामुळे 4-5% कमी उत्पन्न मिळू शकते. कर्नाटकात बागायती पिकांचे 5-10% नुकसान होण्याची शक्यता आहे. टोमॅटो सडण्याची भीती असून, कांद्याला अंकुर फुटले आहे. द्राक्षमण्यांना तडे जावून गळाळे आहेत. डाळिंब, गहू, धान, जिरे, कांदा, टोमॅटो आणि आंबा यांच्या नुकसानीचा परिणाम त्यांच्या किमतीवर होणार आहे.
(स्रोत ः अॅग्रोपेजेस डॉट कॉम)