एटीएम न्यूज नेटवर्क ः राज्यात सलग दोन ते तीन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे एकूण आठ जिल्ह्यांमध्ये साधारण १३,७२९ हेक्टर एवढे नुकसान झाले आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत दिली.
महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याला आजपासून सुरुवात झाली. राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ माजवला आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पशुधनाच्या नुकसानीसह पिके जमीनदोस्त झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, असा स्थगन प्रस्ताव आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मांडला.
श्री. फडणवीस म्हणाले, की पालघरमध्ये विक्रमगड आणि जव्हार या भागात ७६० हेक्टरमध्ये आंबा आणि काजूचे नुकसान झाले. नाशिकमध्ये कळवण, नाशिक, त्र्यंबकेश्वर, निफाड या भागात २,६८५ हेक्टरवर गहू, भाजीपाला, द्राक्ष आणि आंब्याचे नुकसाने झाले.
धुळ्यात साखरी, शिनखेडा, शिरपूर ३१४४ हेक्टरचे नुकसान झाले आहे. यामध्ये मका, गहू, हरभरा, ज्वारी, केळी, पपईचे नुकसान झाले. नंदुरबारमध्ये नंदुरबार, नवापूर, अक्कलकुव्वा, शहादा, तळोदा, अक्रानी येथे १,५७६ हेक्टरचे मका, गहू, हरभरा, ज्वारी, केळी, आंबा या पिकांचे नुकसान झाले.
जळगावमध्ये भुसावळ, धरणगाव येथे २१४ हेक्टरवर गहू, मका, ज्वारी, केळी या पिकांचे नुकसान झाले. अहमदनगर जिल्ह्यात राहुरी, नेवासा, अकोले, कोपरगाव येथे ४,१०० हेक्टरवर मका, गहू, कांदा, भाजीपाला या पिकांचे नुकसान झाले. तर बुलडाण्यात नांदुरा येथे ७७५ हेक्टरवर मका, गहू, कांदा, ज्वारी, हरभरा पिकांचे नुकसान झाले. वाशिममध्ये ४७५ हेक्टरवर चार तालुक्यांत गहू, हरभरा, फळपिक असे एकूण १३,७२९ हेक्टरवर नुकसान झाले.
दरम्यान, विरोधकांनी इतर भागात झालेल्या नुकसानाची उल्लेख केला. त्यावरू फडणवीस म्हणाले, की आता आलेली माहिती दिली आहे. अजून माहिती येणार आहे.