एटीएम न्यूज नेटवर्क ः पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील एका शेतकरी उत्पादक कंपनीने जीआय-टॅग असलेल्या पुरंदर अंजिरांची 550 किलोची भारतातील पहिली व्यावसायिक खेप हाँगकाँगला यशस्वीरित्या निर्यात केली आहे, असे वृत्त अपेडाने इंडियन एक्स्प्रेसच्या हवाल्याने प्रसिद्ध केले आहे.
या निर्यातीबद्दल माहिती देताना पुरंदर हाईलँड्सचे संचालक रोहन उर्सल म्हणाले, की 10 फेब्रुवारी रोजी मालाची निर्यात करण्यात आली. आयात करणार्या ग्राहकाकडून तपशीलवार अभिप्राय मिळाल्यानंतर ही खेप यशस्वी आणि चांगली स्वीकारण्यात आली. त्यामुळे पुढील ऑर्डरसाठी आयात करणार्या देशांमध्ये रस निर्माण झाला आहे. आम्ही आता मलेशिया आणि इतर देशांना निर्यात करणार आहोत.
पुरंदर हाईलँड्स आणि सायन अॅग्रीकोस यांच्यातील हा संयुक्त प्रयत्न होता. या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाच्या अतुल्य भारतच्या ‘व्हिजिट इंडिया २०२३’ मोहिमेसाठी मालाची ब्रँडिंग करण्यात आली.
उर्सल म्हणाले, की निर्यातीसाठी आवश्यक रसद समजून घेण्यासाठी ते लहान प्रमाणात प्रयोग करत आहेत. फळांचा साठवणूक काळ अधिक राहण्यासाठी त्यांची योग्य पद्धतीने कापणी करून योग्यरित्या पॅक करणे आवश्यक आहे.
पुरंदर हाईलँड्सचे सदस्य आणि संचालक मंडळ पुणे जिल्ह्यातील पुरंदर आणि बारामती विभागातील आहेत. या परिसरात दर्जेदार अंजीर आणि सीताफळाचे उत्पादन घेण्यासाठी हे सदस्य काम करत आहेत.
उर्सल म्हणाले, की अधिक मागणी असताना त्यांनी दर आठवड्याला सुमारे 450-550 किलो निर्यात गुणवत्तेचे अंजीर पुरवठा करण्याचे वचन दिले आहे. ते म्हणाले, की त्यांना मलेशियालाही निर्यात करण्याच्या ऑर्डर मिळाल्या आहेत.
शेतकऱ्यांचा विकास आणि निर्यात गुणवत्तेच्या फळांची कापणी सुनिश्चित करण्यासाठी शेतकरी उत्पादक संस्था आणि कृषिनिविष्ठा क्षेत्रात काम करणारी दिग्गज बायेर क्रॉप सायन्स कंपनी कार्यरत आहे. छोट्या मालाच्या यशस्वी चाचणीनंतर त्यांनी व्यावसायिक माल निर्यात करण्याचे निश्चित केले. विशेष म्हणजे, पहिली नमुना खेप जर्मनीतील हॅम्बर्ग आणि काही युरोपीय युनियन देशांमध्ये पाठवल्यानंतर ही निर्यात झाली आहे.
(स्रोत - apeda.gov.in)