एटीएम न्यूज नेटवर्क : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था,पुणे (सारथी) वतीने महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र नाशिक व आर.जी. सपकाळ फार्मसी कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने महाराणी सईबाई महिला सक्षमीकरण योजनेअंतर्गत मराठा कुणबी, कुणबी मराठा या जातीतील महिलांसाठी औषधी व सुगंधी वनस्पती लागवड व प्रक्रियेवर आधारीत उद्योजकता विकास प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. २० सप्टेंबर ते २५ ऑक्टोबर या कालावधीत अंजनेरी येथील आर.जी. सपकाळ फार्मसी कॉलेजमध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे.
प्रशिक्षणात केशरंजक तेल, केशवर्धक तेल, मसाज तेल, सुकोमल लेप, च्यवनप्राश, मोरावळा, गुलकंद, शतावरी कल्प यांचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण तसेच उद्योजकीय योजना, बाजारपेठ पाहणी, प्रकल्प अहवाल, विक्री कौशल्य या विषयावर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याशिवाय औद्योगिक भेट आयोजित केली जाणार आहे. प्रशिक्षणासाठी महिलांना प्राधान्य दिले जाईल. अपेक्षित महिला उमेदवार न मिळाल्यास पुरुषांना प्रवेश दिला जाईल. १९ सप्टेंबरला दुपारी १.०० वाजता सपकाळ फार्मसी कॉलेज येथे लाभार्थी निवडीसाठी मुलाखत होणार आहेत. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र प्रदान केले जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी यांनी दिली.
प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी किमान आठवी पास, १८ ते ४५ वर्षाची वयोमर्यादा, वार्षिक उत्पन्न ८ लाखाच्या आत, मराठा, कुणबी, मराठा कुणबी या जातीतील लाभार्थी किमान १५ वर्षांपासून महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. प्रवेशासाठी फोटो, आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, डोमेसाइल, सर्टिफिकेट, मागील तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला ही कागदपत्रे आवश्यक आहे.