एटीएम न्यूज नेटवर्क : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ व आशियाई विकास बँक सहाय्यित मॅग्नेट प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे दिनांक २२ ऑगस्ट २०२४ रोजी फळे, भाजीपाला व फुले निर्यात परिषदेचे आयोजन यशदा, पुणे येथे आयोजित करण्यात येत आहे.
या परिषदेचे उद्घाटन मा. ना. श्री. अब्दुल सत्तार, मंत्री, पणन व अल्पसंख्यांक, महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते होणार असून कार्यक्रमास मा. अनुप कुमार भा.प्र.से., अपर मुख्य सचिव, सहकार व पणन, महाराष्ट्र राज्य हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. सदर परिषदेस शेतकरी, शेतकरी उत्पादन कंपन्यांचे प्रतिनिधी, निर्यातदार, संबंधित विभागाचे अधिकारी, कृषिमाल निर्यात उद्योगातील विविध संस्था व तज्ञ यांना एकत्रित आणणे हा या परिषदेचा महत्त्वाचा उद्देश आहे.
जगातील कृषीमालाच्या निर्यातीसंदर्भात मागण्यांबाबत विचार केला असता बऱ्याच आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये मागण्या कठीण असतात. त्या मागणीनुसार गुणवत्तापुर्ण मालाचे उत्पादन करणे, त्याची प्रतवारी करणे, त्याचे पॅकेजिंग करणे याला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. राज्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांचे देखील मोठ्या प्रमाणात जाळे निर्माण होत आहे. यामधून नवनवीन निर्यातदार तयार होणे. स्वतः शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्याचा निर्यातीमध्ये सहभाग वाढवणे या अनुषंगाने ही निर्यात परिषद होत आहे.
महाराष्ट्र राज्य हे कृषी मालाच्या उत्पादन व निर्यातीमध्ये अग्रगण्य राज्य आहे. विविध फळे, भाजीपाला व इतर कृषीमालाचे देखील गुणवत्तापूर्ण उत्पादन राज्यांमध्ये होत असते. राज्यामधे आंबा, केळी, द्राक्षे, डाळिंब आणि संत्री ही फळे मोठ्या प्रमाणात उत्पादित होतात. याबरोबरच सिताफळ, पेरु, चिकु, मोसंबी, स्ट्रॉबेरी, अंजीर याही फळांची मोठ्या प्रमाणामध्ये व्यावसायिक शेती होत असुन त्यांच्याही निर्यातीकरिता मागणी वाढत चालली आहे.
आमच्या भाज्या, कांद्यापासून टोमॅटोपर्यंत, हिरवी मिरची, भेंडी जगभरातील स्वयंपाकघरातील मुख्य पदार्थ आहेत. याव्यतिरिक्त, आमचा फ्लोरिकल्चर उद्योग, गुलाब, जरबेरा आणि कार्नेशन यांनाही निर्यातीमध्ये मोठी मागणी आहे. या सर्व पिकांच्या निर्यातवृद्धीकरिता प्रशिक्षण व पायाभुत सुविधा इ. मध्ये कृषि पणन मंडळ महत्वाची भुमिका बजावत आहे. तसेच, मॅग्नेट प्रकल्प राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्याचा मुल्य साखळीमधील सहभाग वाढविण्याकरिता क्षमतावृद्धी, पायाभुत सुविधांकरिता अर्थसहाय्य, कमी व्याजदरामध्ये कर्ज इ. सुविधा उपलब्ध करुन देत आहे.
या परिषदेमध्ये अपेडा, डी.जी.एफ.टी., एन.पी.पी.ओ., जे.एन.पी.टी. कॉनकोर, फेडरेशन ऑफ इंडियन एस्पोर्ट ऑर्गनायझेशन तसेच राज्यातील विविध फळे, भाजीपाला व फुलाचे यशस्वी निर्यातदार यांचे मार्गदर्शनदेखील आयोजित करण्यात येणार आहे. परिषदेमध्ये पॅकेजिंग, वाहतूक आणि लॉजिस्टिक सुधारण्यासाठी धोरणे याबाबत देखील चर्चा होणार आहे.
या परिषदेमधुन शासनाच्या कृषीमाल संदर्भित विविध विभागांच्या योजना, त्यांचे निकष, जागतिक बाजारातील ट्रेंड, गुणवत्ता मानके आणि निर्यातविषयक नियमांची माहिती देखील उपस्थितांना होणार आहे. तसेच सदर परिषदेमधून निर्यातदार व निर्यात बाजारातील इतर प्रमुख घटकांचा देखील एकमेकांशी संपर्क येणार असल्यामुळे ही परिषद राज्यातून फळे, भाजीपाला व फुलांच्या निर्यातीवृद्धीकरिता उपयुक्त ठरणार आहे.