एटीएम न्यूज नेटवर्क ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नानुसार 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्यात कृषी क्षेत्राचा मोठा वाटा असेल. त्यासाठी कृषी क्षेत्रातील उच्च शिक्षणाकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. त्यासाठी काय करावे लागेल याविषयी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी एका कार्यक्रमात भाष्य केले आहे. याविषयीचे वृत्त अपेडाने दैनिक जागरणच्या हवाल्याने प्रसिद्ध केले आहे.
या कामात जागतिक बँक आधीच भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या सहकार्याने राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प (एनएचईपी) हा प्रकल्प चालवत असून, या प्रकल्पाचा आणखी विस्तार करण्यात येणार आहे. जागतिक स्तरावर कृषी क्षेत्रातील उच्च शिक्षण देण्यासाठी भारत हे प्रमुख केंद्र बनले पाहिजे हा जागतिक बँक आणि आयसीएआरचा हेतू आहे.
आयसीएआर आणि जागतिक बँकेच्या मदतीने या संदर्भात तीन दिवसीय चर्चासत्राचे उद्घाटन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केले. या वेळी श्री. तोमर म्हणाले की, कृषी क्षेत्रातील आव्हानांवर मात करण्यासाठी कृषी क्षेत्रातील उच्च शिक्षणाकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. तरच भारत विकसित देश बनू शकेल.
राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्पाबाबत ते म्हणाले की, गेल्या पाच वर्षांतील कामगिरी लक्षात घेता या प्रकल्पाकडून अधिक अपेक्षा वाढल्या आहेत. जागतिक बँकेचे वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ बेकजोद शमसिव्ह म्हणाले की, एनएएचईपीअंतर्गत सर्व उद्दिष्टे पूर्ण झाली आहेत. आता कृषी क्षेत्रात डिजिटलचा समावेश करण्यावर अधिक भर दिला जाणार आहे.
(स्रोत ः अपेडा)