एटीएम न्यूज नेटवर्क ः फेब्रुवारी महिन्यात व्हॅलेंटाईन डेचा उत्साह असतो. आपल्या प्रियजनांना गुलाब फूल आणि शुभेच्छापत्रांची देवाणघेवाण करून व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. या काळात गुलाबांच्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. याच पृष्ठभूमीवर भारतीय गुलाबांना परदेशात 'अच्छे दिन' आले असून, येथील गुलाबांची मागणी वाढत आहे.
रशिया-युक्रेन युद्धामुळे भारतीय गुलाब फुलांच्या बाजारपेठेत संभाव्य लाभार्थी झाला आहे. तळेगाव येथील इंडियन सोसायटी ऑफ फ्लोरिकल्चर प्रोफेशनल्स (आयएसएफपी) च्या अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, या व्हॅलेंटाईन हंगामात भारतीय गुलाब उत्पादक गुलाबाची निर्यात दुपटीने वाढण्याची अपेक्षा करत आहेत. रशिया-युक्रेन युद्धामुळे युरोपला फुलांचे उत्पादन होऊ शकले नाही. आयएसएफपीचे अध्यक्ष प्रवीण शर्मा यांच्या मते, भारताची एकूण गुलाब निर्यात नोव्हेंबर 2022 मध्ये रु. 18.34 कोटींवर पोहोचली आहे. 2021 मध्ये ती रु.9.68 कोटी इतकी होती.
शर्मा म्हणाले की, युरोपमधील युद्ध आणि ऊर्जा संकटामुळे युरोपमधील उत्पादकांना हिवाळ्यात फुलांचे उत्पादन घेण्यापासून परावृत्त केले आहे. यामध्ये फुलांच्या संगोपनासाठी आवश्यक उष्णता देणे, कृत्रिम प्रकाश देणे, कार्बनडाय ऑक्साई़डचे संवर्धन यासारख्या उच्च ऊर्जा वापराच्या साधनांमुळे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उच्च श्रम खर्च वाढल्याचा समावेश होतो.
अनेक आघाडीच्या डच उत्पादकांनी या कारणांमुळे हिवाळ्याच्या हंगामात उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व बाबी लक्षात घेता नोव्हेंबरपर्यंतच्या विक्रीच्या आकडेवारीनुसार आमच्या फुलांना मागणी आहे, असे ते म्हणाले.
आयएसएफपीच्या माहितीनुसार, कोविड-19 च्या धक्क्यानंतर भारतातील फुलांची निर्यात पुन्हा रूळावर आली आहे. निर्यातीसाठी गेली दोन वर्षे अत्यंत वाईट होती. अनेक फुल उत्पादकांनी उत्पादन थांबवले. तथापि, देशांतर्गत बाजारपेठांनी महामारीच्या काळात दिलासा दिला. आता वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आणि वाढत्या देशांतर्गत बाजारपेठेमुळे, फूल उत्पादकांमध्ये पुन्हा एकदा उत्साह आहे.
या वर्षी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही मोठ्या संधी आहेत. मालवाहतूक खर्चात वाढ झाल्यामुळे परदेशी खरेदीदारांशी वाटाघाटी कठीण झाल्या आहेत. निर्यातदारांसाठी वाढत्या मालवाहतुकीचे सर्वात मोठे आव्हान असले, तरी आंतरराष्ट्रीय बाजार आता भारताच्या 2019 च्या निर्यात पातळीच्या अगदी जवळ येत आहेत. ही निर्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास 30% वाढली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय गुलाबांची वेगळी प्रतिमा आहे. प्रामुख्याने ब्रिटेन (एकूण निर्यातीपैकी 35%), ऑस्ट्रेलिया (19%) आणि जापान (18%) या देशांमध्ये निर्यात केली जाते. त्यानंतर मलेशिया, सिंगापूर आणि आखाती देशांमध्ये व्हॅलेंटाईन हंगामासाठी विशेष ऑर्डर्स दिल्या जातात.
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका हे निर्यात गुणवत्तेच्या फुलांच्या लागवडीसाठी प्रमुख फुलशेती केंद्र आहे. आयएसएफपीला व्हॅलेंटाईन हंगामात फुलांची निर्यात रु.50 कोटी (कोविडपूर्वीच्या पातळीवर) ओलांडण्याची अपेक्षा आहे.
महाराष्ट्राव्यतिरिक्त देशातील प्रमुख गुलाब उत्पादक राज्यांमध्ये तामिळनाडू, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल यांचा समावेश होतो. फुलांची निर्यात प्रामुख्याने मुंबई आणि बंगळुरू विमानतळांवरून होते. व्हॅलेंटाईन हंगामासाठी 60% पेक्षा जास्त जहाज वाहतूक मुंबईतून होते.