एटीएम न्यूज नेटवर्क ः भारताने 2022-23 विपणन वर्षाच्या 9 फेब्रुवारीपर्यंत 27.83 लाख टन साखरेची निर्यात केली आहे, ज्यामध्ये बांगलादेश आणि इंडोनेशिया या प्रमुख बाजारपेठ ठरल्या आहेत, अशी माहिती ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशन (एआयएसटीए) ने दिली.
इतर देशांमध्ये भारताने चालू विपणन वर्षाच्या ऑक्टोबर-फेब्रुवारी 9 या कालावधीत जिबूतीला 2.47 लाख टन, सोमालियाला 2.46 लाख टन आणि यूएईला 2.06 लाख टन साखरेची निर्यात केली आहे.
ऑक्टोबर ते सप्टेंबरदरम्यान साखर विपणन वर्षाचा कालावधी असतो. सरकारने यापूर्वी 2022-23 विपरणन वर्षाच्या मेपर्यंत 60 लाख टन निर्यातीला परवानगी दिली आहे.
ऑल इंडिया शुगर ट्रेड असोसिएशनच्या माहितीनुसार, 1 ऑक्टोबर 2022 ते यावर्षी 9 फेब्रुवारी या कालावधीत कारखान्यांनी एकूण 27,83,536 टन साखर निर्यात केली आहे.
सुमारे 4.24 लाख टन साखर लोडिंग केली जात आहे, तर 3.79 लाख टन साखर शुद्धीकरण केंद्रांना वितरित करण्यात आली आहे. या कालावधीत ही साखर निर्यात मानली जाते, असे त्यात नमूद केले आहे.
जगातील प्रमुख साखर उत्पादक देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातून 2021-22 या विपणन वर्षात 112 लाख टन साखर निर्यात झाली होती. एआयएसटीएच्या सुरुवातीच्या अंदाजानुसार, 2022-23 विपणन वर्षात साखरेचे उत्पादन 35.8 दशलक्ष टन होईल, हे उत्पादन मागील वर्षातील विक्रमी 36.5 दशलक्ष टनापेक्षा थोडे कमी आहे.