पिके, रोग, कीड व्यवस्थापनाचा अभ्यास, हवामान प्रतिरोधक तंत्रज्ञान विकसित
एटीएम न्यूज नेटवर्क: भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आयसीएआर) हवामान बदलाच्या शेतीवरील परिणामांचा अभ्यास करण्यासाठी एक प्रमुख नेटवर्क प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पात पिके, पशुधन, फलोत्पादन आणि मत्स्यपालन या क्षेत्रांचा अभ्यास केला जाणार असून, या माध्यमातून हवामान प्रतिरोधक तंत्रज्ञान विकसित करून त्याला प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमांतर्गत बारा कृषी विभागांमध्ये हवामान बदलासंबंधी रोग, कीटक आणि महत्त्वाच्या पिकांचा डेटाबेसद्वारे अभ्यास करण्यात आला.
आयसीएआरकडून रोग आणि कीटकांना सहन करणार्या हवामानास अनुकूल विविध पिकांमधील वाण विकसित करण्यात आले आहेत. 2014 पासून एकूण 1,752 हवामान अनुकूल वाण विकसित करण्यात आले. त्यात रोग आणि कीटक प्रतिरोधक 1,352 वाणांचा समावेश आहे. याशिवाय ५८ ठिकाणी स्थानविशिष्ट हवामान अनुकूल तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे.
देशातील 650 जिल्ह्यांसाठी कृषी आकस्मिक आराखडा तयार करण्यात आला आहे. असुरक्षा मूल्यमापनाच्या आधारे 446 गावांचा समावेश असलेल्या 151 क्लस्टर्समध्ये शेतात हवामान प्रतिबंधक तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक करण्यात येत आहे.
विविध डेटा जमा करण्यासाठी माहिती, संवाद व तंत्रज्ञान (आयसीटी) आधारित कीटकांवर पाळत ठेवण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. कीटकांच्या स्थितीचा अंदाज लावण्यासाठी स्थान विशिष्ट हवामान आधारित मॉडेल विकसित करण्यात आले आहे. कीटकांचा अंदाज लावण्यासाठी डिजिटल साधने, कीटकनाशक आणि बुरशीनाशक मोजमाप यंत्र आणि पूर्वानुमान मॉड्यूलसह पिकांच्या एकात्मिक कीड व्यवस्थापनबद्दलच्या मोबाइल अॅप्सची निर्मिती करण्यात आली आहे.
वाळवंटातील टोळ हे सीमेपलीकडून स्थलांतरित होणारे कीटक आहेत. ते झुंडीमध्ये एकत्रितपणे शेकडो किलोमीटर उडू शकतात. 2019-20 आणि 2020-21 या कालावधीत भारतात नोंदवलेली टोळधाड ही 26 वर्षांनंतरची सर्वात मोठी टोळधाड होती.
टोळांच्या झुंडीच्या समस्येचा सामना करण्यासाठी भारत सरकारतर्फे राजस्थानमध्ये 8 आणि गुजरातमध्ये 2 अशी टोळ मंडळ कार्यालये, जोधपूर येथे एक टोळ चेतावणी संस्था, बिकानेर येथे टोळांच्या तपासणीसाठी एका केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. टोळ हे जगभरातून स्थलांतरित होत असलेले कीटक असल्याने अन्न आणि कृषी संघटना आणि दक्षिण पश्चिम आशिया आयोगासोबत टोळांची वास्तविक स्थिती, हालचाल आणि नियंत्रणाविषयी माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी समन्वय साधण्यात येत आहे.
टोळांपासून संरक्षणासाठी पूर्वसूचना आणि सल्ले नियमितपणे जारी करण्यात आले. बाधित क्षेत्रातील शेतकर्यांना विविध संप्रेषण पद्धतींद्वारे व्यवस्थापन धोरण आधीच कळविण्यात आले. रसायने वेळेत उपलब्ध करून देण्यात आली. रसायने फवारण्यासाठी हेलिकॉप्टर, ड्रोन आणि ट्रॅक्टर आणि पिकअप वाहने यांसारख्या विविध प्रकारच्या यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला.