एटीएम न्यूज नेटवर्क : राज्याचे नवे कृषी आयुक्त म्हणून आयएएस प्रवीण गेडाम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांची जलसंधारण सचिव म्हणून बदली झाली आहे. डॉ. गेडाम यांचा वाळू उपसा रोखणारा सोलापूर पॅटर्न अतिशय गाजला होता. त्यांनी उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, जळगाव, नाशिकसह विविध शहरात काम केले आहे.
कार्यक्षम आणि धडाकेबाज प्रशासकीय अधिकारी म्हणून ओळख
अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ते नागरिकांमध्ये लोकप्रिय आहेत. जळगावातील घरकुल घोटाळ्यात सुरेशदादा जैन यांच्यासह अनेक नेत्यांना गेडाम यांच्या खंबीर भूमिकेमुळे जेलची हवा खावी लागली आहे. नाशिकमधील बिल्डर लॉबीच्या मनमानीलाही त्यांनी चाप लावला होता. जनताभिमुख प्रशासन ही त्यांची कार्यशैली पंतप्रधानांनाही भावली आहे. कार्यक्षम आणि धडाकेबाज प्रशासकीय अधिकारी म्हणून ओळख गेडाम यांनी निर्माण केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खास मर्जीतील सनदी अधिकाऱ्यांपैकी ते एक आहेत.
पंतप्रधान मोदी यांचे सर्वाधिक लक्ष कृषी खात्यावर केंद्रीत
सध्या पंतप्रधान मोदी यांचे सर्वाधिक लक्ष हे कृषी खात्यावर केंद्रीत आहे. शेतकरी जीवनमान सुधारावे, शेतकऱ्याचे उत्पन्न वाढावे यासाठी मोदी सरकारची धडपड सुरू आहे. अशात राज्यातील कृषी कारभाराचे गेल्या काही दिवसात पार धिंडवडे निघाले होते.
सुनील चव्हाण यांची वर्षभरातच बदली
सुनील चव्हाण यांची गेल्यावर्षीच 22 नोव्हेंबर रोजी कृषी आयुक्त पदावर बदली करण्यात आली होती. मात्र, अवघ्या वर्षभराच्या आत त्यांना या पदावरून मंत्रालयात हलविण्यात आले आहे. त्यांना कृषी आयुक्तपदाचा कार्यभार तातडीने सोडून त्वरित मंत्रालयातील मृद व जलसंधारण विभागाच्या सचिव पदाचा कार्यभार स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.