एटीएम न्यूज नेटवर्क : राज्याच्या सुक्ष्म सिंचन प्रकल्पात भरीव कामगिरी केल्याबद्दल फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते यांना २०२४ चा मानाचा 'स्कॉच' पुरस्कार जाहीर झाला असल्याचे 'स्कॉच' समूहाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक दलाल यांनी या पुरस्काराची घोषणा केली. १३ जुलै रोजी दिल्लीतील विशेष सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण होईल
'प्रति थेंब अधिक पीक' उपक्रमाचा गौरव
राज्यात राबविलेल्या 'प्रति थेंब अधिक पीक' या उपक्रमाचे सादरीकरण स्कॉच निवड समितीसमोर करण्यात आले होते. अर्ज निवडीपासून ते अनुदान वाटपापर्यंत शेतकऱ्यांना संगणकीय प्रणालीद्वारे पारदर्शकता व जलद सेवा देणारा हा प्रकल्प आहे. शेतकऱ्यांना विशिष्ट कालावधीत अर्जाची सक्ती न करता ऑनलाइन अर्ज करण्याची सेवा वर्षभर देण्यात आली आहे.
सूक्ष्म सिंचनाखाली सर्वाधिक क्षेत्र
२०२२-२३ मध्ये या प्रकल्पाने केंद्राकडून निधीचे चारही हप्ते मिळवत वेळेत शेतकऱ्यांना अनुदान देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले होते. देशात सर्वाधिक क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्याचा मान महाराष्ट्राकडे आहे. डॉ. मोते यांनी कागद विरहित अनुदान वितरण व्यवस्था तयार केली. पर्यवेक्षणाचे टप्पे कमी केले.
फळबागांची वाढली उत्पादकता
सूक्ष्म सिंचन क्षेत्र वाढल्यामुळे पाणी, खते, पैसा याची बचत झाली. फळबागांची उत्पादकता वाढून उत्पन्नातही भर पडली. डॉ. मोते यांनी पाठपुरावा करीत शासनाची पूरक अनुदान योजना सुरू करण्यात यश मिळवले. त्यामुळे शेतकऱ्यांना आता राज्यात सूक्ष्म सिंचन संचासाठी ८० ते ९० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळत आहे
.