एटीएम न्यूज नेटवर्क ः निर्यातीचा हंगाम सुरू होण्यास झालेला उशीर, मोठा आयातदार बांगलादेशने वाढवलेले आयात शुल्क आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे रशियाला पाठवण्याचा वेग कमी झाल्यासारखे प्रतिकूल घटक असूनही, 2022-23 या आर्थिक वर्षात द्राक्षांची निर्यात वाढली आहे. या आशयाचे वृत्त अपेडाने द हिंदू बिझनेस लाईनच्या हवाल्याने प्रसिद्ध केले आहे.
या हंगामात द्राक्षांचे चांगले उत्पादन झाले असून, निर्यातक्षम द्राक्षांची गुणवत्ताही चांगली आहे. युरोपमधून द्राक्षांना मोठी मागणी आहे. यावर्षीची निर्यात 2019 च्या सर्वोच्च पातळीपर्यंत पोहोचेल अशी आमची अपेक्षा आहे, असे सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड (सह्याद्री फार्म्स) चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांनी सांगितले.
सन 2018-19 मध्ये भारताच्या द्राक्ष निर्यातीने 335 दशलक्ष डॉलर इतका उच्चांक गाठला होता. परंतु त्यानंतरच्या वर्षांमध्ये कोविड लॉकडाऊन आणि जगात माल लादण्याच्या आव्हानांमुळे, मालवाहतुकीचे वाढलेले दर, खराब हवामान, उत्पादनात झालेली घट यासारख्या कारणांमुळे निर्यातीत घट झाली होती.
यावर्षी निर्यातीचा हंगाम प्रतिकूल हवामानामुळे पंधरवड्याने म्हणजेच जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात लांबला असला तरी निर्यातीने वेग घेतला आहे. आता हवामान स्वच्छ आहे. उत्पादन आणि उत्पादकता वाढण्यास मदत होत आहे.
गेल्या तीन वर्षांत खराब हवामानामुळे उत्पादनात घट झाली होती. युद्धामुळे रशियाला माल पाठविणे शक्य झाले नाही. तसेच बांगलादेशने आयात शुल्क 32 रुपयांवरून 53 रुपये प्रतिकिलो केले आहे. ही थोडी चिंतेची बाब असून, बांगलादेशला सुमारे 10-15 टक्के कमी माल निर्यात होऊ शकतो, असे शिंदे म्हणाले.
भारतातून जवळपास 2.4 लाख टन ताज्या द्राक्षांची निर्यात केली जाते. त्यापैकी युरोपमध्ये 1 लाख टनापेक्षा जास्त तर बांगलादेशात 60,000 टन निर्यात होते. नंतर पश्चिम आशिया, रशियासह इतर देशांना निर्यात होते.
अपेडाच्या ताज्या आकडेवारीनुसार, भारताने चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-नोव्हेंबर या कालावधीत 69.65 दशलक्ष डॉलर किमतीची द्राक्षे निर्यात केली आहेत. मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 23 टक्क्यांनी वाढली आहे. एक लहान हंगामी फळ असल्याने ताज्या द्राक्षांची खेप जानेवारी ते मार्च या कालावधीत पाठवली जाते.
सध्या, भारत हा जगातील द्राक्षांचा 11वा सर्वात मोठा निर्यातदार आहे. गेल्या दशकात 12.6 टक्क्यांच्या चक्रवाढ वार्षिक वाढ दराने निर्यात वाढली आहे.
हे वर्ष द्राक्ष निर्यातीसाठी चांगले आणि सकारात्मक असेल. आम्ही खूप चांगले करू, असे अपेडाचे अध्यक्ष एम. अंगमुथू म्हणाले.
'गेल्या वर्षीच्या तुलनेत द्राक्ष निर्यात तुलनेने ठीक आहे. आतापर्यंत हंगाम चांगला गेला आहे. आम्ही 100 पेक्षा जास्त कंटेनर सुमारे 1,500 टन द्राक्षे पाठवण्याची अपेक्षा करत आहोत, असे आयएनआय फार्म्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पंकज खंडेलवाल यांनी सांगितले. कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी अॅग्रोस्टारने आयएनआय कंपनी विकत घेतली आहे. आयएनआय कंपनी दरवर्षी प्रामुख्याने युरोपला सुमारे 100 कंटेनर द्राक्षे निर्यात करते.
यावर्षी चांगली मागणी आणि चांगले उत्पादन लक्षात घेता सह्याद्री फार्म्सला या वर्षी ताज्या द्राक्षांच्या विक्रीत १० ते १५ टक्के वाढ अपेक्षित आहे. गेल्या वर्षी, सह्याद्रीने सुमारे 1,100 कंटेनर द्राक्षांची निर्यात केली होती. प्रत्येक कंटेनरमध्ये सुमारे 14 टन द्राक्षे होती, असे श्री. शिंदे यांनी सांगितले.
आकडेवारी काय सांगते?
2021-22 मध्ये भारताची द्राक्ष निर्यात 305.7 दशलक्ष डॉलर होती. मागील वर्षीच्या ती 314 दशलक्ष डॉलरच्या तुलनेत 2.6 टक्क्यांनी घसरली आहे.
2021-22 या कालावधीत नेदरलँड्स, बांगलादेश, रशिया, यूके, यूएई, जर्मनी, नेपाळ, सौदी अरब, मलेशिया आणि थायलंड या देशात निर्यात झाली होती. 2021-22 साठीच्या तिसऱ्या आगाऊ अंदाजानुसार, 2020-21 च्या 3.358 दशलक्ष टनांच्या अंतिम अंदाजापेक्षा द्राक्ष उत्पादन 3.47 दशलक्ष टन इतके जास्त आहे.
(स्रोत ः अपेडा)