नाशिक - नाशिक जिल्ह्यात १५ ते १८ मार्च या काळात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा तसेच काही ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या काळात ताशी ३० ते ४० किमी प्रतितास या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने प्रादेशिक हवामान पूर्वानुमान केंद्र, मुंबई यांनी पुरविलेल्या हवामान अनुमानावरून शेतकऱ्यांनी आपल्या कृषिमालाची कशी काळजी घ्यावी याविषयी इगतपुरी येथील विभागीय कृषी संशोधन केंद्राने सल्ला दिला आहे.
राज्यात उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात १५ ते १८ मार्च दरम्यान विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपीट होण्याचा इशारा दिला आहे. नाशिक जिल्ह्यातील कांदा, द्राक्ष, डाळिंब या हाताशी आलेल्या पिकांंचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
कांदा
साठवून ठेवलेल्या कांदा पिकावर मर आणि ढगाळ हवामानामुळे करपा रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. कांदा लागवड केलेल्या क्षेत्रात पाणी साचले असल्यास ते त्वरित काढणे गरजेचे असून, पाणी साचणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य पद्धतीने चर काढावेत. पाणी साचून राहिल्यामुळे मर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. ढगाळ हवामानामुळे कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकते. जांभळा आणि काळा करपा रोगाच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब २५ ग्रॅम प्रति १० लिटर किंवा अॅझॉक्सिस्ट्रॉबिन १० मिली, किंवा टेब्यूकोनोझोल १० मिली प्रति १० लिटर व त्यासोबत १० मिली स्टिकर घेऊन गरजेनुसार ८ ते १० दिवसांच्या अंतराने एक ते दोन फवारण्या कराव्यात.
द्राक्षे व डाळिंब
गारपिटीमुळे द्राक्ष मणी फुटण्याची समस्या असते. विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस किंवा गारपीटीपासून द्राक्ष पिकाचे संरक्षण करण्यासाठी स्कटिंग बॅग किंवा अॅल्युमिनिअम कोटेड पेपरचा वापर करावा. सध्या द्राक्ष पक्वतेत असलेल्या बागांमध्ये मण्यांना तडे जाण्याची शक्यता आहे. तडे गेलेले खराब मणी काढून टाकावे आणि नंतर द्राक्षबागेत क्लोरीन डायऑक्साइड ५० पीपीएम या प्रमाणात फवारणी करावी.
या वातावरणात ढगाळ हवामानामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. भुरी रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी सल्फर मिसळून फवारणी करावी. किंवा फवारणी करताना घडावर डाग येऊ नये म्हणून चांगल्या दर्जाचे फवारणी यंत्र वापरावेत, किंवा मेट्रोफेनॉन ५० टक्के एससी २५० मिली प्रति हेक्टर किंवा मायक्लोब्युटॅनील १० डब्ल्यूपी @ ०.४ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून बुरशीनाशकांची फवारणी करावी.
द्राक्ष बागांमध्ये पाणी साचले असल्यास ते बाहेबाहेर काढणे आवश्यक आहे. बोद वाफसा स्थितीत राहतील अशी काळजी घेणे आवश्यक आहे.
द्राक्ष बागेतील पाने व घडांमधील साचलेले पाणी काढण्यासाठी रिकामा ब्लोअर बागेत उलटसुलट फवारणे आवश्यक आहे. त्यामुळे आर्द्रता कमी होण्यास मदत होईल.
पशुधनावर परिणाम
विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपीटीचा विपरित परिणाम पशुधनावर होतो. यामध्ये नवजात वासरांच्या मृत्यूचे प्रमाण वाढते, दूध उत्पादन कमी होऊन जनावरांच्या शरीर विज्ञानावर प्रभाव दिसून येतो. दुभत्या जनावरांना गोठ्यात किंवा गुरे व शेळ्यांना शेडमध्ये ठेवणे, गारपिटीपासून वाचविण्यासाठी त्यांना कोरडे अंथरूण (गोणपाट) द्यावे.