एटीएम न्यूज नेटवर्क: जागतिक अन्न सुरक्षेबाबतच्या चिंतेचे निराकरण करण्यासाठी भारताने जी-20 देशांना कृषी परिसंस्थेसाठी '3S' धोरण लागू करण्याचे आवाहन केले आहे.
भारताच्या जी-20 अध्यक्षतेखालील कृषी कार्यकारी गटाच्या प्रतिनिधींची बैठक 13-15 फेब्रुवारी दरम्यान इंदूर येथे झाली. जी-20 च्या पुढील बैठका चंडीगढ, वाराणसी आणि हैदराबाद येथे होण्याची शक्यता आहे.
3S दृष्टिकोन हा "स्मार्ट" आणि "शाश्वत" शेतीला प्रोत्साहन देतो, यामुळे प्रत्येकाला "सेवा" मिळते असे प्रतिपादन केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि पोलादमंत्री ज्योतिर्रादित्य सिंधिया यांनी केले. 3S म्हणजे स्मार्ट, शाश्वत आणि सेवा होय.
येथे पहिल्या जी-20 कृषी प्रतिनिधींच्या बैठकीनिमित्त प्रसारमाध्यमांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की, भारतासाठी शेतीला नेहमीच प्राधान्य दिले गेले आहे आणि जगासाठी ही बाब आता पूर्णपणे समोर आली आहे.
सिंधिया यांनी स्मार्ट शेतीसाठी कृषी उत्पादकता वाढविण्यासाठी ड्रोन आणि इतर आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर भर दिला. शाश्वत शेतीसाठी शेतकऱ्यांनी अधिक उत्पादन मिळवण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. प्रगत तंत्रज्ञान आणि विपणनावर लक्ष केंद्रित करण्यासोबतच चांगल्या निविष्ठांचा वापर करावा, असेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, मागील आठ वर्षांत भारताचे अन्नधान्य उत्पादन 265 दशलक्ष टन वरून 315 दशलक्ष टन झाले आहे. गेल्या आठ वर्षांत कृषी क्षेत्रासाठी अर्थसंकल्पीय परिव्यय साडेचार पटीने वाढवून 10.5 अब्ज डॉलर (सुमारे 86,700 कोटी रुपये) झाला आहे.
भारताने कृषी क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे, असे सांगून ते म्हणाले की, दूध उत्पादनात भारताचा जगातील पहिला, भाजीपाला आणि फळांमध्ये दुसरा आणि अन्नधान्य उत्पादनात तिसरा क्रमांक आहे.