एटीएम न्यूज नेटवर्क ः फळे, भाजीपाला, मसाले पिकांच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाल्याने भारताचे फलोत्पादन चालू पीक वर्षात (जुलै 2022-जून 2023) विक्रमी 350.87 दशलक्ष टनांवर पोहोचण्याची शक्यता आहे.
तथापि, महत्त्वाच्या जीवनावश्यक वस्तूंपैकी कांदा आणि टोमॅटोचे उत्पादन थोडे कमी असल्याचा अंदाज आहे. परंतु बटाट्याचे उत्पादन अधिक असेल.
सन 2021-22 मध्ये सर्व फळबाग उत्पादन 347.18 दशलक्ष टन होते.
सन 2022-23 साठी क्षेत्र आणि उत्पादनाचा पहिला आगाऊ अंदाज आणि सन 2021-22 चा अंतिम अंदाज जाहीर करताना केंद्रीय कृषी मंत्रालयाने सांगितले, की राज्ये आणि इतर सरकारी संस्थांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे डेटा संकलित करण्यात आला आहे.
कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकर्यांची मेहनत आणि कृषी शास्त्रज्ञांचे कौशल्य तसेच केंद्राच्या धोरणांना विक्रमी उत्पादनाचे श्रेय दिले. कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, फलोत्पादनाखालील क्षेत्र वाढत असून, ते 2022-23 मध्ये 28.28 दशलक्ष हेक्टरवर पोहोचले आहे, जे गेल्या वर्षी 28.04 दशलक्ष हेक्टर होते.
सन 2021-22 मधील कांद्याचे उत्पादन 31.69 दशलक्ष टनांवरून यावर्षी 31.1 दशलक्ष टन राहण्याचा अंदाज आहे. टोमॅटोचे उत्पादन 20.69 दशलक्ष टन विरुद्ध 20.62 दशलक्ष टन राहण्याची शक्यता आहे. बटाट्याचे उत्पादन गेल्या वर्षीच्या ५६.१८ दशलक्ष टनांच्या तुलनेत ५९.७४ दशलक्ष टन इतके वाढण्याची अपेक्षा आहे.
भाज्यांचे एकूण उत्पादन २०९.१४ दशलक्ष टनाच्या तुलनेत २१२.५३ दशलक्ष टन इतके आहे. सन 2021-22 मध्ये असलेले 107.51 दशलक्ष टन फळांचे उत्पादन या वर्षी 107.75 दशलक्ष टन राहण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या अंतिम अंदाजाच्या तुलनेत पहिल्या अंदाजातील अंतर किरकोळ आहे. त्यानंतरच्या अंदाजात उत्पादन वाढू शकते, असे तज्ज्ञांनी सांगितले.