एटीएम न्यूज नेटवर्क : सध्या कृषी निविष्ठा, रासायनिक खते विक्रेते लिकिंगमुळे आर्थिकदृष्ट्या भरडले जात असल्यामुळे आज दि. २१ सप्टेंबर २०२४ रोजी नाशिक अॅग्रो डिलर्स असोसिएशनची (नाडा) या विषयावर बैठक पार पडली. या बैठकीमध्ये संपूर्ण जिल्ह्यात कुठेही रासायानिक खते लिकिंग मटेरियलसह खरेदी करू नये म्हणजेच खते लिकिंगसह खरेदी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
लिकिंगमुळे शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसतोच तसेच विक्रेत्यांना कृषी विभागाचाही त्रास सहन करावा लागत आहे. रासायनिक खते विक्रीचा व्यवसाय करताना कुठलाही मानसिक त्रास सहन करावा लागू नये तसेच लिकिंगमुळे होणारे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी रासायनिक खते लिकिंग खरेदी बंद करणे गरजेचे आहे.आपण सर्व कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी एकजूट दाखवली तर निश्चितच यावर चांगला मार्ग निघेल असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
सदर बैठकीला नाशिक अॅग्रो डिलर्स असोसिएशनचे पदाधिकारी, नाशिक जिल्ह्यातील तालुका अध्यक्ष तसेच सभासद व कृषी निविष्ठा विक्रेते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.