SUBSCRIBE E-Paper
English मराठी
AGRI NEWS

कृषी क्षेत्राच्या विकासामध्ये कृषी सेवा केंद्रांच्या भूमिकेवर २८ नोव्हेंबर रोजी कृषीथॉनमध्ये विशेष परिसंवाद

Nov 27, 2026
News Image

नाशिक : भारतीय शेतीच्या आधुनिकीकरणात आणि उत्पादनवाढीमध्ये दर्जेदार कृषी निविष्ठा व तांत्रिक मार्गदर्शनाचा मोठा वाटा असतो. शेतकऱ्यांपर्यंत योग्य वेळी दर्जेदार बियाणे, खते आणि पीक संरक्षण निविष्ठा पोहोचवण्यासोबतच नवीन कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यात कृषी सेवा केंद्रांची भूमिका अत्यंत निर्णायक ठरते. याच पार्श्वभूमीवर कृषीथॉन २०२६ मध्ये ‘कृषी क्षेत्राच्या विकासामध्ये कृषी सेवा केंद्रांची भूमिका’ या विषयावर विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवार, दि. २८ नोव्हेंबर २०२६ रोजी पहिल्या सत्रात सकाळी १०.३० वाजता माडसांगवी, शिलापूर टोलनाका जवळ, संभाजीनगर रोड, नाशिक येथे हा परिसंवाद होणार आहे.

या महत्त्वाच्या सत्रात एस एम एल लिमिटेडच्या कार्यकारी संचालक कोमलजी शाह या प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. शेतीच्या शाश्वत विकासासाठी पीक संरक्षण व पोषण व्यवस्थापन कसे करावे, आधुनिक व संशोधन आधारित कृषी निविष्ठांचा शेतकऱ्यांपर्यंत प्रभावी प्रसार कसा करावा आणि कृषी सेवा केंद्र चालकांनी शेतकऱ्यांना तांत्रिक सल्ला व सहकार्य देऊन शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी कसे योगदान द्यावे, याविषयी त्या सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.

शेतकरी आणि कृषी निविष्ठा विक्रेते यांच्यातील समन्वय अधिक दृढ व्हावा, तसेच कृषी क्षेत्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कृषी सेवा केंद्रांनी जबाबदारीने व व्यावसायिक दृष्टिकोनातून कसे कार्य करावे, यावर या परिसंवादात सखोल विचारमंथन होणार आहे.

हा परिसंवाद कृषी सेवा केंद्र चालक, वितरक आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून, सर्वांनी या सत्राचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन कृषीथॉनच्या आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

स्थळ : कृषीथॉन २०२६, माडसांगवी, शिलापूर टोलनाका जवळ, संभाजीनगर रोड, नाशिक