नाशिक : वाढते तापमान, अनियमित पाऊस आणि बदलत्या हवामानाचा थेट परिणाम शेतीसोबतच पशुपालन आणि दुग्धव्यवसायावरही होत आहे. हवामानातील बदलांमुळे जनावरांचे आरोग्य, दूध उत्पादन क्षमता आणि चारा उपलब्धतेसमोर मोठी आव्हाने उभी राहिली आहेत. या प्रतिकूल परिस्थितीत पशुधनाचे योग्य व्यवस्थापन करून दुग्धव्यवसाय अधिक फायदेशीर व शाश्वत कसा करावा, याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी ‘कृषीथॉन २०२६’ मध्ये ‘बदलते हवामान - पशुधन व्यवस्थापन आणि दुग्धव्यवसायाचे भविष्य’ या विषयावर विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार, दि. ३० नोव्हेंबर २०२६ रोजी दुसऱ्या सत्रात मांडसांगवी, शिलापूर टोलनाका जवळ, छत्रपती संभाजीनगर रोड, नाशिक येथे हा परिसंवाद होणार आहे.
या महत्त्वपूर्ण सत्रात पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. संतोष उमाजी शिंदे आणि मार्गदर्शक गणेश निंबाळकर हे शेतकरी व पशुपालकांना सखोल मार्गदर्शन करणार आहेत. बदलत्या हवामानात जनावरांचे व्यवस्थापन आणि लसीकरण कसे राखावे, उष्णतेचा ताण टाळण्यासाठी गोठ्याची रचना व निवारा कसा असावा, वर्षभर हिरव्या व सकस चाऱ्याचे नियोजन कसे करावे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दूध उत्पादनात सातत्य कसे टिकवावे, तसेच पशुपालकांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनांचा लाभ कसा घ्यावा, याविषयी ते सविस्तर माहिती देणार आहेत.
शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसायाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. बदलत्या आव्हानांवर मात करत पशुपालकांनी व्यावसायिक दृष्टिकोन स्वीकारून स्वतःची आर्थिक प्रगती साधावी, हा या परिसंवादाचा मुख्य उद्देश आहे. हा परिसंवाद शेतकरी, पशुपालक, दूध उत्पादक संस्थांचे प्रतिनिधी आणि कृषी उद्योजकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून, सर्वांनी या सत्राचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन कृषीथॉनच्या आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
स्थळ : कृषीथॉन २०२६, मांडसांगवी, शिलापूर टोलनाका जवळ, छत्रपती संभाजीनगर रोड, नाशिक.