नाशिक : शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती पद्धतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा. विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयचा वापर करून शेती अधिक उत्पादनक्षम आणि फायदेशीर करण्यावर भर द्यावा, असे आवाहन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. माडसांगवी येथील शिलापूर टोलनाक्याजवळ आयोजित १९ व्या आंतरराष्ट्रीय कृषीथॉन २०२६ प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यंदाचे वर्ष शेतकऱ्यांसाठी अडचणीचे ठरले असले, तरी राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. शेतकऱ्यांना मदत करणे ही शासनाची भूमिका असून, त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
खरीप हंगामात शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. रब्बी हंगामातही पेरणी अपेक्षित गतीने झालेली नाही. या पार्श्वभूमीवर सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे भरणे यांनी स्पष्ट केले.
यावेळी आमदार सरोज अहिरे यांनी नाशिक तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची मागणी केली. ही मागणी रास्त असल्याचे सांगत, यासंदर्भातील अहवाल सादर झाल्यानंतर त्यावर निर्णय घेतला जाईल, असे भरणे यांनी स्पष्ट केले.
उद्घाटन सोहळ्याला आमदार दिलीप बनकर, आमदार नितीन पवार, आमदार सरोज अहिरे, माजी आमदार जयंत जाधव, भाऊलाल तांबडे, द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले, नाडाचे अध्यक्ष अरुण मुळाणे, आयोजक संजय न्याहारकर, साहिल न्याहारकर, अश्विनी न्याहारकर, अंकिता न्याहारकर उपस्थित होते.
शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि नवनवीन प्रयोगांची माहिती शेतकऱ्यांना मिळावी, यासाठी २६ ते ३० नोव्हेंबरदरम्यान या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. आधुनिक शेती यंत्रसामग्री, कृषी ड्रोन, स्मार्ट सिंचन प्रणाली, सौर कृषिपंप आणि सुधारित बियाण्यांसह ५० हून अधिक पिकांची प्रत्यक्ष लागवड प्रात्यक्षिके हे प्रदर्शनाचे प्रमुख आकर्षण आहे