एटीएम न्यूज नेटवर्क ः केंद्र सरकारने 101 कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) मंडईना (बाजार किंवा यार्ड) ई-नाम या इलेक्ट्रॉनिक व्यासपीठावर जोडण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे आता ई-नामवर जोडल्या जाणाऱ्या बाजार समित्यांची एकूण संख्या 31 मार्चपर्यंत 1,361 होईल. परिणामी ई-नामवर 2021-22 मधील 51,000 कोटी रुपयांवरून चालू आर्थिक वर्षात उलाढाल वाढण्याची शक्यता आहे, या आशयाचे वृत्त अपेडाने द हिंदू बिझनेस लाईनच्या हवाल्याने प्रसिद्ध केले आहे.
चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत 260 बाजार समित्या इलेक्ट्रॉनिक नॅशनल अॅग्रीकल्चर मार्केट (ई-एनएएम) प्लॅटफॉर्मवर सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे बाजार समित्यांची एकूण संख्या 1,260 झाली आहे. 22 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये असलेल्या 2,40,500 व्यापारी आणि 1,08,237 कमिशन एजंटनी इलेक्ट्रॉनिक व्यासपीठावर नोंदणी केली आहे. 2,433 शेतकरी उत्पादक कंपन्यांसह (एफपीओ) सुमारे 1.75 कोटी शेतकऱ्यांनी ई-नामवर नोंदणी केली आहे. यावर 203 कृषी आणि बागायती उत्पादनांचा ऑनलाइन व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
या व्यासपीठावर सहभागी होण्यास तयार असलेल्या खाजगी मंडईंची नोंदणी करण्याचा सरकारचा विचार आहे. त्यासाठी राज्य सरकारांना विनंती केली जाऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान खाजगी क्षेत्रातील काही मंडई स्वत:चा उद्देश घेऊन एखाद्या वस्तूवर व्यवहार करत असल्यामुळे त्या ई-नामवर
सहभागी होण्यास इच्छुक नाहीत.
कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी गेल्या वर्षी जुलैमध्ये बेंगळुरूमध्ये ई-नाम पोर्टलवर प्लॅटफॉर्म ऑफ प्लॅटफॉर्म (पीओपी)चे अनावरण केले होते. पीओपी सुरू झाल्यामुळे शेतकर्यांना त्यांचे उत्पादन त्यांच्या राज्याच्या सीमेबाहेर विकण्याची सुविधा मिळाली आहे. यामुळे अनेक बाजारपेठा आणि ग्राहकांना डिजिटल सेवा मिळत आहे.
विविध व्यासपीठांवर सुमारे 41 सेवा प्रदाते पीओपीअंतर्गत सेवा देत आहेत. यामध्ये ते व्यापार, गुणवत्ता तपासणी, गोदाम, फिनटेक, बाजार माहिती आणि वाहतूक यासारख्या विविध मूल्य साखळी सेवांची सुविधा देतात. पीओपीने एक डिजिटल परिसंस्था तयार केली असून, ती कृषी मूल्य साखळीतील विविध विभागांमधील विविध व्यासपीठांच्या कौशल्याचा फायदा घेत आहे.
2016 मध्ये ई-नामचे अनावरण झाल्यापासून व्यासपीठावर 31 डिसेंबर 2022 पर्यंत 2.42 लाख कोटी रुपयांचा एकूण 69 दशलक्ष टन व्यापार झाला आहे. त्यापैकी एक पंचमांश हा केवळ गेल्या आर्थिक वर्षात झाला होता.
अॅग्री ट्रेड मीडियावर इंग्रजी आणि मराठीमध्ये कृषी-व्यवसायासंदर्भात बातम्या वाचा आणि स्वत:ला करा अपडेट. झटपट अपडेटसाठी Facebook, Instagram आणि YouTube वर Agri Trade Media चे सदस्य होण्यास विसरू नका.