एटीएम न्यूज नेटवर्क : राज्यात यंदाच्या खरीप हंगामात १४७ लाख ७७ हजार हेक्टरवरील पेरण्यांचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. त्यासाठी बियाण्यांची सुमारे १९ लाख २८ हजार क्विंटल इतकी आवश्यकता आहे. त्यापेक्षा अधिक म्हणजे जवळपास २५ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध असून बियाण्यांची मुबलकता असल्याची माहिती कृषी संचालक (निविष्ठा व गुणनियंत्रण) विकास पाटील यांनी दिली.
यंदा नाशिक जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ६ लाख २८ हजार ७०० हेक्टर प्रस्तावित करण्यात आले. खरीप हंगामासाठी २ लाख २० हजार टन खतांचे आवंटन मंजूर झाले आहे. ७१ हजार २४३ क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे.
बियाण्यांच्या पुरवठ्यामध्ये राज्य बियाणे महामंडळाकडून (महाबीज) ३.७६ लाख क्विंटल, राष्ट्रीय बियाणे महामंडळ ५९ हजार क्विंटल, खासगी बियाणे कंपन्यांकडून २० लाख ६५ हजार क्विंटल मिळून २५ लाख क्विंटल बियाण्यांच्या उपलब्धतेचे नियोजन आहे.
सोयाबीन
खरिपात सोयाबीन हे प्रमुख पीक आहे. सोयाबीन पिकाखाली सर्वाधिक ५० लाख ७० हजार क्विंटल इतके क्षेत्र आहे. त्यासाठी १३.३१ लाख क्विंटल बियाण्यांची गरज असताना प्रत्यक्षात १८.४६ लाख क्विंटल इतके मुबलक बियाणे उपलब्ध आहे.
भात
भात पिकाखाली १५ लाख ९१ हजार क्विंटल क्षेत्र असून, २.२९ लाख क्विंटल बियाण्यांची गरज आहे. प्रत्यक्षात भाताचे २.५५ लाख क्विंटल इतके बियाणे उपलब्ध आहे.
कडधान्ये
कडधान्ये पिकाखाली १९ लाख हेक्टर क्षेत्र आहे. त्यासाठी ८२ हजार क्विंटल बियाण्यांची गरज असून, ९१ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध आहे.
मका व इतर पिके
मका पिकाचे ९ लाख ८० हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यासाठी १.४७ लाख क्विंटल बियाण्यांची गरज असताना प्रत्यक्षात १.६० लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे.
इतर पिकांखालील एकूण १२.३६ लाख हेक्टर क्षेत्र आहे. त्याकरता ४४ हजार क्विंटल बियाण्यांची गरज असून, प्रत्यक्षात ५२ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध आहे.