फसवणूक टाळण्यासाठी द्राक्ष बागायतदार संघाकडून शेतकऱ्यांचे प्रबोधन
एटीएम न्यूज नेटवर्क ः यंदा पाऊस लांबल्याने द्राक्षछाटण्यांना झालेला विलंब असो अथवा हिवाळ्यात तापमान घसरल्यामुळे मण्यांमध्ये साखरेचे कमी झालेले प्रमाण असो, अथवा ढगाळ हवामानामुळे भुरी रोगाचा प्रादुर्भाव असो, अशा विविध समस्या येऊनही द्राक्ष हंगाम चांगला जाईल असे चित्र दिसून येत आहे. त्यात कंटेनरचे भाडे कमी झाल्यामुळे युरोपात द्राक्षांना चांगला भाव मिळत आहे.याचा परिणाम देशांतर्गत मार्केटमध्येही होणार आहे, असा आशावाद महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले यांनी एटीएमशी बोलताना व्यक्त केला.
कैलास भोसले म्हणाले की, या वर्षी द्राक्षाला सूर्यप्रकाश चांगला मिळाल्याने त्याच्या गुणवत्तेवर चांगला परिणाम झाला आहे. मध्यंतरी तीन-चार दिवस ढगाळ वातावरण राहिल्यामुळे द्राक्षबागांवर भुरी रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचा फवारणीचा खर्च वाढला. यंदा थंडीचे प्रमाणही जास्त आहे. तापमान सतत ५ अंशाच्या खाली राहिले, तर अखेरच्या टप्प्यातील द्राक्षांच्या आकाराची समस्या निर्माण होऊ शकते.
काही द्राक्ष निर्यातदार कमी साखरेचा माल पाठवतात. असे निर्यातदार खूपच नगण्य आहेत. परंतु त्याचा फटका चांगल्या निर्यातदारांना बसतो. परिणामी त्याचा फटका शेतकऱ्यांनाही बसतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात निर्यात करताना साखरेचे प्रमाण चांगले असलेल्या द्राक्षांची निर्यात व्हावी यासाठी द्राक्ष बागायतदार संघ काळजी घेत आहे.
- कैलास भोसले, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ
द्राक्षनिर्यातीबद्दल ते म्हणाले की, युरोपला गेल्या वर्षी कंटेनरचे भाडे ७,५०० डॉलर्स होते. या वर्षी ते बऱ्याच प्रमाणात कमी झाले आहे. त्यामुळे द्राक्षांना चांगले दर मिळत आहेत. त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना मिळू शकतो. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये द्राक्षांना चांगले दर मिळाले, तर स्थानिक मार्केटमध्ये चांगले दर मिळतात. स्थानिक मार्केटमध्ये रंगीत जातींचे द्राक्षे १०० रुपये प्रतिकिलोच्या वर विक्री होत आहेत. निर्यातीतही तीच स्थिती आहे. या वर्षी द्राक्षांना चांगली गोडी असेल. सूर्यप्रकाश मिळाल्यानंतर द्राक्षांमध्ये साखरेचे योग्य प्रमाण मिळू लागले आहे.
द्राक्षांची गुणवत्ता कायम राखण्यासाठी सर्व द्राक्षांची तपासणी करून १६ ब्रिजच्या आतील द्राक्षांची निर्यात होऊ देऊ नये अशी सूचना द्राक्ष बागायतदार संघाने अपेडा, अॅगमार्क आणि कृषी विभागाला पत्र पाठवून केली आहे. यासाठी अपेडा, अॅगमार्कच्या प्रतिनिधींसोबत बैठकीचे आयोजनही करण्यात आले आहे. योग्य साखरेचे प्रमाण असलेला माल निर्यात झाला, तर संपूर्ण हंगामात द्राक्षांचे दर टिकून राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
फसवणूक टाळण्यासाठी उपाययोजना
द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी द्राक्ष बागायतदार संघाने उपाययोजना केल्या आहेत. निफाड येथे नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि शेतकऱ्यांची एकत्रित बैठक घेऊन प्रोबधन केले जाणार आहे. गेल्यावर्षी केलेल्या उपाययोजनेअंतर्गत सौदा पावतीमध्ये दुरुस्ती करून त्या पावतीचा फॉरमॅट शेतकऱ्यांना वाटप करणार आहोत. अशी सौदा पावती शेतकऱ्यांनी बनविली, तर त्यांची फसवणूक टळणार आहे, असेही श्री. भोसले यांनी सांगितले.