एटीएम न्यूज नेटवर्क : भारतातील सर्वात मोठ्या शेतकरी उत्पादक कंपनी सह्याद्री फार्म्सने प्रसिद्ध पेटंट केलेले संत्रा वाण "टँगो" मँडरीन सादर करण्याची घोषणा केली आहे. ग्राहकांमध्ये मागणी असेलेले हे फळ लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे लक्षणीय आर्थिक लाभ आणि कृषी उत्पादकतेत वाढ होईल.
कॅलिफोर्निया विद्यापीठाने विकसित केलेले आणि युरोसेमिलास या अग्रगण्य कृषी कंपनीने जागतिक स्तरावर परवाना प्राप्त केलेला टँगो मंडारीन त्याच्या अद्वितीय चव, आकार, गंध, रंग, उत्पादकता यामध्ये हे वाण वैशिष्ट्यपूर्ण आहे. विशेष म्हणजे हे फळ बियाविरहित असून प्रति २५ फळांमागे फक्त ०.२ बिया आहेत.
सह्याद्री फार्म्स या शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून या वाणांची आयात करण्यात आली आहे. या कंपनीने २६,००० हून अधिक शेतकऱ्यांना पेटंट द्राक्ष वाणांचा फायदा मिळवून दिला आहे. द्राक्षांपाठोपाठ आता टॅंगो हे संत्रा वाण आणले यामुळे भारतीय लिंबूवर्गीय फळ उत्पादकांची उत्पादकता व आर्थिक उत्पन्न यात लक्षणीय वाढ होईल.
राज्यात लिंबूवर्गीय फळपिकाखाली १,३५००० हुन अधिक क्षेत्र असून सुमारे १,७०,००० हुन अधिक शेतकरी या पिकाचे उत्पादन घेत आहेत. संत्र्याचे वार्षिक उत्पादन १८ लाख टन इतके आहे. प्लांट क्वारंटाइन प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर हे वाण संस्थेशी संबंधित शेतकरी उत्पादक कंपन्यामार्फत सभासद शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. या उपक्रमामुळे भारतातील प्रिमियम फळे आणि प्रक्रिया केलेल्या लिंबूवर्गीय उत्पादनांची आयात कमी होईल आणि कृषी अर्थव्यवस्थेला फायदा होईल.