नाशिक : कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. ही बंदी ३१ मार्च २०२४ पर्यंत लागू राहिल. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी,व्यापारी आक्रमक झाले आहेत. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या विदेश व्यापार महासंचालनालयाने यासंदर्भातील अधिसूचना काढली आहे. त्यानुसार ३१ मार्च २०२४ पर्यंत कांदा निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी तात्काळ अंमलात आणली जाईल. असे त्यात नमूद करण्यात आले आहे.
कांद्याचे दर पाडण्यासाठी कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क, नंतर निर्यात मूल्यात प्रचंड वाढ असे निर्णय घेणाऱ्या केंद्र सरकारने आता कांदा निर्यातीवर सरसकट बंदी घातली आहे. निर्यातबंदीच्या निर्णयाचे लगेचच बाजारात पडसाद उमटले. राज्यातील प्रमुख कांदा बाजारांमध्ये कांद्याचे दर घसरले. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी निदर्शने, आंदोलने करून आपला रोष व्यक्त केला आहे.
पिंपळगाव बाजारसमितीत गुरुवारी ७ डिसें. नवीन कांद्याला २५०० रू.प्रति क्विंटल तर उन्हाळ कांद्याला ३२०० रु. सरासरी दर मिळाला होता. शुक्रवारी हेच दर नवीन कांद्याला १७०० पर्यंत घसरल्यामुळे शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला. त्यामुळे उन्हाळ कांद्याचे लिलाव झाले नसल्याचे बाजार समितीकडून सांगण्यात आले.