एटीएम न्यूज नेटवर्क ः आपल्या देशात बहुतांश प्रमाणात पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते. शेतीसाठीची वाढती साधने, तंत्रज्ञानामुळे जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचे प्रयत्न शेतकरी करतात. परंतु आता कमी जागेत अधिक उत्पादन घेण्याचा यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे.
भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर)-भारतीय फलोत्पादन संशोधन संस्थेने (आयआयएचआर) लिलियम आणि जरबेरा यांसारख्या फुलांव्यतिरिक्त कोबी आणि फ्लॉवर या पिकांच्या 'संरक्षित' लागवडीसाठी एक नवीन उभ्या शेतीची रचना विकसित केली आहे, अशी माहिती अपेडाने दी हिंदू बिझनेस लाईनच्या हवाल्याने प्रसिद्ध केली आहे.
नवीन रचना 12 फूट इतकी उंच असू शकते. पॉली हाऊसमध्ये प्रभावी जागेचा वापर करून प्रति युनिट क्षेत्राच्या आधारावर पारंपरिक शेतीच्या तुलनेत उत्पादकता सहा पटीने वाढू शकते, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
आयआयएचआरचे प्रमुख शास्त्रज्ञ सी. अस्वथ सांगतात, कमी किमतीच्या उभ्या शेतीच्या संरचनेत सुमारे 11 स्तरांचे रचलेले थर असतात. त्यात ठिबक सिंचनची व्यवस्था केली जाते. माती कम थर मिश्रण असलेल्या पिशव्यांमध्ये कोकोपीट, गांडूळ खत, भाताचा भुसा आणि मशरूम उगवता येतात.
अनेक थरांमुळे पॉली हाऊसमध्ये उपलब्ध युनिट क्षेत्राचा वापर ५-६ पटीने वाढतो. जास्त लागवड घनतेमुळे उत्पादन आणि उत्पादकता सहा पटीने वाढवता येते, असे अस्वथ म्हणाले.
एक मीटर रूंदी आणि तीन मीटर रूंदी आणि सुमारे 12 फूट उंची असलेल्या या प्रत्येक संरचनेची उभारणी करण्यासाठी सुमारे 25,000 रुपये खर्च येतो, असे अस्वथ यांनी सांगितले. आयआयएचआरने शहरी आणि निमशहरी भागात पॉली हाऊसमध्ये लागवडीचा सराव करणार्या शेतकर्यांनी नवीन संरचनांचा व्यापक अवलंब करण्यासाठी फलोत्पादनाच्या एकात्मिक विकास अभियानांतर्गत 50 टक्के अनुदान प्रस्तावित केले आहे, असे ते म्हणाले.
आयआयएचआरने बेंगळुरूमधील हेसरघट्टा येथील त्यांच्या आवारात बागायती पिकांच्या संरक्षित लागवडीवरील केंद्रात या नवीन उभ्या शेती संरचनांची स्थापना केली आहे. ज्यामध्ये लिलियमसारख्या उच्च किंमतीची फुल पिकांची तसेच ब्रोकोली आणि कोबीसारख्या भाज्यांची लागवड केली आहे. आयआयएचआरच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ एस. ए. सफिना म्हणाल्या, की संस्था नवीन उभ्या शेती संरचनेचे पेटंट घेण्याचा विचार करत आहे.
शेती करण्याच्या या पद्धतीमुळे उपलब्ध उभ्या जागेचा कार्यक्षम वापर करून लहान जागेत अधिक उत्पादन घेता येते. इतर भाजीपाला पिके जसे की सोयाबीन, फुलकोबी, विविध पालेभाज्या, स्ट्रॉबेरीसारखी फळे आणि जरबेरा, जिप्सोफिलिया, ग्लॅडिओलस यांसारखी फुले उभ्या शेती पद्धतीने घेता येतात, असे अस्वथ म्हणाले.