एटीएम न्युज नेटवर्क: एक नियामक वार्षिक दुग्धविकास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे, जिथे पात्र महिला स्वयंसहायता गट आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना बल्क मिल्क कुलरसाठी अनुदान दिलेला जाईल. या बचत गटांची नोंदणी महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद)अंतर्गत असणे अनिवार्य आहे.
राज्यातील सहकार क्षेत्रामार्फत करण्यात येणाऱ्या दुग्धव्यवसायाला चालना देऊन शीतसाखळी निर्माण करून दूध संघांच्या सभासद सहकारी दूध संस्थांचे बळकटीकरण करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून विविध घटकांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येतो. यामध्ये संगणक सचिव, मिल्को टेस्टर, दूध संकलनाच्या क्षमतेनुसार एक व दोन हजार क्षमतेचे डीची सेटसह बल्क मिल्क कुलर्स खरेदी करण्यासाठी काही मर्यादेत निधी देण्यात येतो.
अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या विनंतीनुसार दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बचत गटांबरोबरच शेतकरी उत्पादक कंपन्यांनाही बल्क मिल्क कुलरचे वाटप करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार शासन आदेश काढण्यात आला आहे.
बल्क मिल्क कुलर मिळविण्यासाठी लाभार्थी महिला स्वयंसाहाय्यता गटाची उमेद योजनेंतर्गत नोंदणी बंधनकारक आहे. महिला बचत गटांची कृषी दुग्धपूरक व्यवसाय अशा प्रकारची नोंदणी असणे आवश्यक आहे. तसेच सहकारी आणि खासगी पुरवठादारास सलग तीन वर्षे दूध पुरवठा असणे बंधनकारक आहे.
लाभार्थी महिला बचत गटाचे द्वितीय मूल्यांकन प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच या बचत गट व एफपीओंकडे कुठल्याही प्रकारची थकबाकी असता कामा नये. त्यांची आर्थिक स्थिती भक्कम असल्याचे प्रमाणपत्र गटविकास अधिकारी किंवा कृषी अधिकाऱ्याने देणे आवश्यक आहे. लाभार्थी संस्थांनी याआधी कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला बचत गट आणि एफपीओंना मागणीचा सविस्तर प्रस्ताव जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकाऱ्यांमार्फत सादर करावा लागणार आहे. हा प्रस्ताव सादर झाल्यानंतर त्याची छाननी करून दुग्धव्यवसाय विकास आयुक्तांच्या मान्यतेसाठी तो पाठविला जाणार आहे.