आयओटेकवर्ल्ड एव्हिगेशन-वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांच्यात करार
एटीएम न्यूज नेटवर्क ः आयओटेकवर्ल्ड एव्हिगेशन या अग्रगण्य कृषी ड्रोन कंपनीने भारतात शेती उत्पादकता वाढवण्यासह मानवरहित हवाई वाहनांच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (व्हीएनएमकेव्ही) सोबत सामंजस्य करार केला आहे. या कराराची घोषणा कंपनीने नुकतीच केली. या आशयाची बातमी अॅग्रो पेजेसने आयओटेकवर्ल्ड एव्हिगेशनच्या हवाल्याने प्रसिद्ध केली आहे.
गुरूग्राम येथील कंपनीने ड्रोन तंत्रज्ञानातील संशोधनासोबतच कृषी उत्पादन वाढवण्यासह शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी अग्रगण्य शैक्षणिक संस्थेसोबत हा करार केला. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठासोबतही कंपनीने गेल्या महिन्यात अशाच स्वरूपाचा करार केल्याची घोषणा केली होती.
व्हीएनएमकेव्हीच्या वतीने कुुलगुरू डॉ. इंद्रमणी यांनी, तर आयओटेकवर्ल्ड एव्हिगेशनच्या वतीने सहसंस्थापक आणि संचालक अनुप कुमार उपाध्याय यांनी करारावर स्वाक्षरी केली.
श्री. उपाध्याय म्हणाले, की ड्रोन तंत्रज्ञान संशोधनाला चालना देण्याचे आयओटेकवर्ल्ड एव्हिगेशनचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी कृषी विद्यापीठांसोबत भागीदारी करार करण्यासाठी कंपनी आघाडीवर आहे.
या सामंजस्य कराराबाबत माहिती देताना ते म्हणाले, की कृषी क्षेत्रात ड्रोनची जाहिरात करण्यासह विज्ञान आणि तंत्रज्ञानात सहकार्य करण्यासाठी तसेच विद्यापीठात कृषी प्रशिक्षण केंद्र आणि रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन (आरपीटीओ) विकसित करण्यासाठी दोन्ही संस्था काम करणार आहेत.
आयओ टेकवर्ल्ड एव्हिगेशनचे सहसंस्थापक दीपक भारद्वाज म्हणाले, की विद्यापीठांसोबत भागीदारी केल्यामुळे कंपनीला शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याबरोबरच ड्रोन तंत्रज्ञानात संशोधन करण्यास मदत होणार आहे.
शेतकऱ्यांमध्ये कृषी ड्रोनचा वापर वाढला असून, अनेक शेतकरी संघटनाही या मोहिमेत सहभागी झाल्या आहेत. केवळ खर्चच नव्हे, तर वेळेची बचत करत असल्यामुळे हे मानवरहित हवाई रोबोट्स खूप उपयुक्त आहेत. विद्यापीठांमध्ये प्रस्तावित आरपीटीओमध्ये शेतकरी अनुकूल प्रशिक्षण मॉड्यूल आणि ड्रोन पायलट तयार करणे हा या कराराच आणखी एक प्रमुख उद्देश आहे.
श्री. भारद्वाज पुढे म्हणाले, की रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशनची स्थापना करण्यासाठी आयओटेकवर्ल्ड एव्हिगेशन ही विद्यापीठाची तांत्रिक भागीदार असेल. देशातील ड्रोन पायलटची कमतरता भरून काढण्यासही मदत होणार आहे.
सरकारच्या अंदाजाप्रमाणे, भारताला पुढील वर्षापर्यंत किमान एक लाख ड्रोन पायलटची आवश्यकता असेल. विशेष म्हणजे आयओ टेकवर्ल्ड कंपनीचे स्वतःचे पायलट प्रशिक्षण केंद्र आहे. या केंद्रात शेतकऱ्यांना ड्रोन उडविण्याचे प्रशिक्षण दिले जाते. ड्रोन पायलटचा परवाना मिळविण्यासाठीही कंपनीकडून शेतकऱ्यांना मदत केली जाते.
आयओटेकवर्ल्ड एव्हिगेशनबद्दल...
अनुप कुमार उपाध्याय आणि दीपक भारद्वाज यांनी 2017 मध्ये ही भारतातील अग्रगण्य कृषी ड्रोन उत्पादक कंपनी स्थापन केली. 14 जून 2022 रोजी भारत सरकारच्या हवाई नागरी वाहतूक मंत्रालयाने कंपनीला देशातील पहिले प्रमाणपत्र ड्रोन निर्माता म्हणून प्रदान केले आहे. सध्या कंपनीची कार्यालये 12 राज्यांमध्ये आहेत. 30 हून अधिक कंपन्या त्यांच्या भागीदार आहेत. कंपनी कृषी उद्योजकांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देत आहे.
(स्रोत ः अॅग्रोपेजेस)
अॅग्री ट्रेड मीडियावर इंग्रजी आणि मराठीमध्ये कृषी-व्यवसायासंदर्भात बातम्या वाचा आणि राहा अपडेट. झटपट अपडेटसाठी Facebook, Instagram आणि YouTube वर Agri Trade Media चे सदस्य होण्यास विसरू नका.