एटीएम न्यूज नेटवर्क ः तेजस्वी इव्हेंट्स हैदराबाद आणि पीपल फॉर पोल्ट्री छत्तीसगड यांच्या संयुक्त विद्यमाने 25, 26, 27 मार्च 2023 रोजी नाशिकमधील "ठक्कर डोम" येथे इंडिया पोल्ट्री एक्स्पोचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश आणि हरियाणा येथील सुमारे 6000 पोल्ट्री उत्पादक सहभागी झाले होते.
या तीन दिवसीय प्रदर्शनात स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुमारे 80 कंपन्यांनी स्टॉल लावून सहभाग घेतला. त्यामध्ये कुक्कुट खाद्य, औषधे आणि उपकरणे उत्पादित करणाऱ्या कंपन्यांचा समावेश होता. या सर्व कंपन्यांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या उत्पादनांच्या गुणवत्तेबाबत पोल्ट्री उत्पादकांना माहिती उपलब्ध करून दिली.
अंडी आणि चिकन यांच्या वापराबाबत सर्वसामान्यांच्या मनात पसरलेले गैरसमज दूर करणे आणि दैनंदिन आहारात त्यांची उपयुक्तता स्पष्ट करणे हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे. देशातील इतर राज्यांप्रमाणेच मुलांच्या कुपोषणावर उपाय म्हणून महाराष्ट्र सरकारला शाळा आणि अंगणवाड्यांच्या माध्यान्ह भोजनात अंड्यांचा समावेश करण्याची विनंती करणे हेदेखील तीन दिवसीय प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे.
हैदराबाद, बंगळुरू, मुंबई, किंवा दिल्लीसारख्या महानगरांमध्ये अशी प्रदर्शने आयोजित केली जातात. परंतु कुक्कुटपालन क्षेत्रातील लहान शेतकरी, ग्रामीण भागातील नागरिकांना अशा प्रदर्शनापर्यंत पोचता येत नाही. त्यामुळे ते नवीन संशोधनांपासून अनभिज्ञ राहतात. हाच धागा पकडून ग्रामीण आणि निमशहरी भागातील लहान पोल्ट्री उत्पादकांना व्यवसायात विकसित होत असलेल्या नवीन वैज्ञानिक तंत्रांची माहिती देण्यासाठी प्रदर्शन भरविण्यात आले होते.
25 मार्च रोजी प्रदर्शनाचे उद्घाटन महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, प्रसिद्ध चित्रपट अभिनेते मकरंद अनासपुरे, आनंद अॅग्रोचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक उद्धव आहिरे यांच्या हस्ते झाले. या वेळी महाराष्ट्र पोल्ट्री फार्मर्स अँड ब्रीडर्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय नलगीरकर, व्यंकटेश्वरा ग्रुपचे महाव्यवस्थापक डॉ. पी. जी. पेडगावकर उपस्थित होते.
प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २६ मार्च रोजी देशातील नामवंत पोल्ट्री शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञ कुक्कुटपालनातील व्यवस्थापन, रोग आणि निदान यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर व्याख्याने दिली. या प्रदर्शनाला महाराष्ट्र शासनाचा पशुसंवर्धन विभाग, ब्रॉयलर फार्मर्स समन्वय समिती, खाजगी पशुवैद्यकीय संस्था, ब्रॉयलर फार्मर्स अँड ब्रीडर्स असोसिएशन व्ही. पी. ए. एफ. यांसारख्या सरकारी विभाग आणि संघटनांचे सहकार्य लाभले.