एटीएम न्यूज नेटवर्क ः दोन वर्षांच्या कालखंडानंतर पश्चिम आशियातील वाढत्या मागणीमुळे कांद्याच्या निर्यातीला वेग आला आहे. 2022-23 आर्थिक वर्षात भारताने आतापर्यंत 15.19 लाख टन कांद्याची निर्यात केली आहे. त्या तुलनेत 2021-22 या संपूर्ण आर्थिक वर्षात 15.38 लाख टन कांद्याची निर्यात झाली होती.
देशात उत्पादन होणाऱ्या एकूण कांद्यापैकी निर्यातीचा वाटा 10 ते 15 टक्के आहे. ज्यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात आघाडीवर आहेत. खरीप, उशिरा खरीप आणि रब्बी हंगामात कांद्याची निर्यात केली जाते. भारतीय कांद्याला प्रामुख्याने पश्चिम आशिया, श्रीलंका, बांगलादेश, मलेशिया आणि नेपाळमधून मागणी असते.
श्रीलंकेच्या बाजारपेठेला देशाच्या आर्थिक मंदीचा फटका बसला असताना, इतर देशांकडून मागणी वाढत आहे. पाठोपाठ मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्यामुळे देशांतर्गत आणि निर्यात-गुणवत्तेचा कांदा सहज उपलब्ध झाला आहे. गेल्या तीन आर्थिक वर्षांमध्ये जवळपास 15-16 लाख टन निर्यात झाली आहे. दरम्यान, घाऊक बाजारात कांद्याचे भाव पूर्णपणे कोसळू नयेत यासाठी शेतकरी संघटनांनी किंमत स्थिरीकरण निधीची मागणी केली आहे.
रब्बी कांद्याच्या उत्पादनात महाराष्ट्र अग्रेसर असून, नाशिकचे शेतकरी उत्पादनात आघाडीवर आहेत. नवीन किंवा उन्हाळी कांदा बाजारात आला की भाव कोसळण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली. डिसेंबर-जानेवारीमध्ये लावलेल्या या कांद्याची काढणी मार्चनंतर केली जाते. शेतकरी सामान्यतः कांद्याला ओलावा आणि कोंब येण्यापासून वाचवण्यासाठी शेतातील कांद्याच्या चाळीत साठवतात.
(स्रोत - अपेडा)