एटीएम न्यूज नेटवर्क ः अर्ध शुष्क उष्णकटिबंधीय देशांसाठीची आंतरराष्ट्रीय पीक संशोधन संस्था (आयसीआरआयएसएटी) आणि भारतीय तेलबिया आणि उत्पादन निर्यात प्रोत्साहन परिषद (आयओपीइपीसी) यांनी भारतातील दर्जेदार तेलबियांचे उत्पादन वाढविण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली.
या सामंजस्य करारावर आयसीआरआयएसएटीचे महासंचालक डॉ. जॅकलीन ह्युजेस आणि आयओपीइपीसीचे अध्यक्ष नीलेश विरा यांनी भारतातील तेलबियांचे प्रमाण आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी दीर्घकालीन सहकार्य बळकट करण्याच्या उद्देशाने स्वाक्षरी केली.
लागवडीखालील क्षेत्रांचा विस्तार करणे, वैज्ञानिक तंत्रज्ञान उपयोजित करणे, शेतकऱ्यांना उत्तम दर्जाचे प्रमाणित बियाणे प्रदान करणे आणि तेलबियांची पुरवठा साखळी बळकट करण्यासह सर्व स्तरांवर सहकार्य करण्यावर ही भागीदारी लक्ष केंद्रित करणार आहे.
याव्यतिरिक्त ही भागीदारी अन्न सुरक्षा तत्त्वांनाही प्रोत्साहन देईल. भारत सरकारला धोरणे आणि कार्यक्रमांची शिफारस करून भारतीय तेलबिया क्षेत्राच्या वाढीसाठी पाठिंबा देणार आहे.
“शेतकऱ्यांना अशी तेलबिया पिके हवी आहेत, जी हवामानातील बदलांना तोंड देऊ शकतील. बदलत्या मान्सूनच्या पद्धतींचा तेलबिया पिकांवर परिणाम होत आहे. अशा पिकांना परिपक्व होण्यासाठी साधारणतः 110-120 दिवस लागतात. प्रतिकूल हवामानामुळे शेतकरी तेलबिया पिकवू इच्छित नाहीत. त्यासाठी आम्हाला उपाय शोधण्याची गरज आहे," असे श्री. विरा यांनी सांगितले.
आयओपीइपीसीचे संचालक-भुईमूग पॅनेलचे संयोजक किशोर तन्ना म्हणाले, की शेतकरी तेलबिया, विशेषतः शेंगदाण्याचे पीक घेऊ इच्छित नाहीत, त्यामुळे भारत 15 दशलक्ष टन खाद्यतेल आयात करत आहे.
आयसीआरआयएसएटीचे महासंचालक डॉ. ह्युजेस यांनी अल्पभूधारक शेतकऱ्यांचा नफा वाढावा यासाठी निर्यात मूल्यसाखळीतील मध्यस्थांना दूर करण्याची गरज अधोरेखित केली. ग्राहकांना हानिकारक असलेल्या शेंगदाण्यांमधील अफलाटॉक्सिन काढून टाकण्यासाठी उपाय शोधण्याच्या आयसीआरआयएसएटीच्या वचनबद्धतेवरही त्यांनी भर दिला.
या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी आयसीआरआयएसएटीचे कर्मचारी डॉ. शॉन मेस, स्टिफन डी ग्रेलिंग आणि डॉ. जनिला पासुपुलेटी यांच्यासह आयसीआरआयएसएटीचे प्रॉडक्ट प्लेसमेंट प्रमुख डॉ. अशोक कुमार, आयओपीइपीसीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रमेश पी. कोलाथ या वेळी उपस्थित होते.
आयओपीइपीसी या संस्थेला भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने मान्यता दिली आहे. ही संस्था भारतीय तेलबिया/वनस्पती तेल निर्यातदार, परदेशी खरेदीदार, भारत सरकार, भारतातील तेलबिया आणि वनस्पती तेलांसाठी संशोधन आणि विकास संस्था, आंतरराष्ट्रीय संस्था आणि इतर अनेकांसाठी जागतिक स्तरावर अधिकृत संस्थांसोबत समान मंच म्हणून काम करते.
(स्रोत - news.agropages.com)