एटीएम न्यूज नेटवर्क ः भारतीय कृषी क्षेत्रात तंत्रज्ञान आणण्याच्या उद्देशाने भारतीय ड्रोन स्टार्टअप गरुडा एरोस्पेसने निंजाकार्ट या फ्लिपकार्ट समर्थित कृषी-वाणिज्य स्टार्टअपसोबत भागीदारी केली आहे. दोन्ही कंपन्या शेतकऱ्यांना अल्प मुदतीचा वित्तपुरवठा करणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना स्वस्त दरात नवीन ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करता येईल. शेतजमिनींमध्ये ड्रोनचा वापर केल्याने शेतकर्यांचे पीक उत्पादन सुधारण्यास मदत होतेच, शिवाय निविष्ठा खर्च कमी होतो आणि शेतीस्तरीय कार्यक्षमता वाढते.
गरुडा आणि निंजाकार्ट भारतातील खेड्यापाड्यातील उद्योजकांना तंत्रज्ञानाव्यतिरिक्त प्रशिक्षण आणि व्यवसायाच्या संधीही उपलब्ध करून देणार आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना ड्रोन चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. या संधींद्वारे ग्रामीण तरुण 50,000 रुपये ते 1 लाख रुपये दरमहा कमवू शकतात, असा दावा दोन्ही स्टार्टअप्सनी केला आहे.
गरुडा एरोस्पेसचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अग्निश्वर जयप्रकाश म्हणाले, "ही भागीदारी केवळ शेतकऱ्यांना उत्पादन सुधारण्यास आणि खर्च कमी करण्यास मदत करणार नाही, तर तरुण उद्योजकांना कौशल्य आणि व्यवसायाच्या संधीदेखील देणार आहे. हे सहकार्य भारतातील कृषी क्षेत्रावर कायमस्वरूपी प्रभाव विकसित करण्यात मदत करेल, असा आम्हाला विश्वास आहे.”
निंजाकार्टचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तेश्वरन के के म्हणाले, “शेतकऱ्यांसाठी शेती अधिक कार्यक्षम आणि फायदेशीर बनविण्यासाठी तंत्रज्ञानाचा फायदा घेण्यावर आमचा विश्वास आहे. शेतीमध्ये ड्रोनचा वापर केल्याने मातीचे विश्लेषण, पाणी व्यवस्थापन आणि अचूक शेती करण्यातही मदत होईल.”
गरुडा एरोस्पेसकडे सध्या भारतातील 84 शहरांमध्ये 400 ‘मेड-इन-इंडिया’ ड्रोन आणि 500 हून अधिक वैमानिकांचे पथक आहे. निंजाकार्ट 150 गावांमधील एक लाखाहून अधिक शेतकऱ्यांसोबत काम करत असून, त्यांना त्यांचे उत्पन्न सुधारण्यास मदत करत आहे. बी टू सी वरून बी टू बी मॉडेलमध्ये वळले असले तरी, फ्लिपकार्ट आणि वॉलमार्टने 2020 पासून निंजाकार्टमध्ये 175 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक केली आहे.
(स्रोत - news.agropages.com)