एटीएम न्यूज नेटवर्क : राज्यातील शेती उद्योगात उत्सुकतेचा विषय बनलेल्या नव्या पेटंट रंगीत द्राक्ष वाणांच्या हंगामाचा शुभारंभ अयोध्येतील राममूर्तीच्या प्रतिष्ठापनादिनाच्या मुहूर्तावर करण्यात आला. 'सह्याद्री फार्म्स'च्या पुढाकारातून आयात करण्यात आलेल्या या नव्या वाणांच्या द्राक्षांची पहिली खुडणी करण्यात आली. या द्राक्षांची थेट शेतातच विक्री व ऑनलाइन लिलाव करण्यात आला. यात २ टनाहून अधिक द्राक्षांची विक्री झाली. थेट शेतात झालेल्या लिलावाचा हा देशातील पहिलाच प्रयोग आहे.
सह्याद्री आळंदी झोन फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे संचालक कैलास माळोदे यांच्या शेतात "आरा" रंगीत द्राक्ष वाण पाहणी व विक्रीचे आयोजन करण्यात आले. त्यास द्राक्ष उत्पादक व खरेदीदार व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे माजी अध्यक्ष अशोक गायकवाड, उपाध्यक्ष कैलास भोसले, विभागीय अध्यक्ष रवींद्र निमसे, निर्यातदार संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ खापरे, ज्येष्ठ द्राक्ष उत्पादक केदुनाना बोरगुडे यांच्या हस्ते या उपक्रमास सुरुवात झाली. यावेळी सहयाद्री फार्म्सचे अध्यक्ष विलास शिंदे, ज्येष्ठ द्राक्ष उत्पादक सदाशिव शेळके, सुरेश कळमकर, राजाराम बस्ते, रवींद्र बोराडे आदी उपस्थित होते. नव्या "आरा" रंगीत द्राक्ष वाणाचा दुसरा पाहणी व विक्री दिवस त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कोने येथे २६ जानेवारीला भास्कर कांबळे यांच्या शेतात होणार आहे.
द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले यांनी पेटंट वाणांमुळे दर्जेदार द्राक्ष वाणांचा शेतकऱ्यांचा वनवास संपला असल्याची भावना व्यक्त केली. खरी समस्या बाजाराची होती. त्यावरही ऑनलाईन लिलावाचा पर्याय उभा राहत आहे. ही आशादायी बाब असून हा उपक्रम राज्यातील फळशेतीसाठीही पथदर्शी ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
द्राक्ष बागायतदार संघाचे माजी अध्यक्ष गायकवाड यांनी गोड, रसाळ चवीचे उत्तम द्राक्षवाण आणि सरस विपणन या दोन गोष्टींच्या जोरावर शेतीत क्रांती घडतांना दिसत असून तरुण ध्येयवादी शेतकऱ्यांनी हे काम गतीने पुढे न्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली.