एटीएम न्यूज नेटवर्क : या वर्षीचा द्राक्षाचा हंगाम सुरू झाला आहे. पुरेसा माल अद्याप बाजारात आला नसला तरी जी काही द्राक्षे निर्यात केली जात आहेत, त्यामधील साखरेचे प्रमाण कमी आहे. आंबट किंवा खराब गुणवत्तेची द्राक्षे निर्यात झाल्यास नकारात्मक परिणाम होऊन पुढील द्राक्ष खेपांना त्याचा फटका बसू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. राज्यातून नाशिक, सांगली, सोलापूर, लातूर या भागात द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते.
नाशिक जिल्ह्यात द्राक्षाचे क्षेत्र मोठे आहे. यंदा पाऊस लांबल्याने द्राक्ष हंगाम उशिरा सुरू झाला. द्राक्ष बागांची छाटणी उशिरा झाल्याने यावर्षी फळधारणा उशिराने झाली. द्राक्षांच्या विविध वाणांमध्ये साखर उतरण्यास सुरुवात झाली असली तरी त्याचे प्रमाण कमी आहे. भारतीय बाजार पेठेत द्राक्ष विकण्यासाठी साखरेचे प्रमाण १७ ब्रिक्सपर्यंत आवश्यक आहे. तर युरोपीय देशांमध्ये हेच प्रमाण १५ ब्रिक्सपर्यंत आवश्यक आहे.
भारतातून युरोपात द्राक्षांच्या निर्यातीला सुरुवात झाली आहे. युरोपमध्ये द्राक्षाला १३०-१४० रुपये किलोचा दर मिळत आहे. परंतु शेतकरी आणि निर्यातदारांनी कमी साखरेच्या मालाची निर्यात करू नये. युरोपमध्ये कमी साखरेचा माल पोहोचला तर त्याचा परिणाम पूर्ण हंगामात बसण्याची शक्यता आहे. भारताच्या द्राक्षांची गुणवत्ता खराब आहे असा शिक्का बसण्याचा धोका आहे. असा इशारा अभ्यासकांनी दिला आहे.
युरोपमध्ये पोहोचणाऱ्या कंटेनरचे फर्स्ट इम्प्रेशन इस ए लास्ट इम्प्रेशन असते. तिथे ती द्राक्षे भारतीय म्हणूनच ओळखले जातात. द्राक्षांचा अॅसिड शुगर रेषोचा योग्य असेल, तर युरोपीय ग्राहकांकडून पुन्हा मागणी केली जाते. परंतु पहिल्याच फेरीत द्राक्षे आंबट लागली तर त्याचा पुढील निर्यातीवर नकारात्मक परिणाम दिसून येतो.
- हेमंत ब्रह्मेचा, द्राक्ष उत्पादक आणि निर्यातदार, ओढा, नाशिक