एटीएम न्यूज नेटवर्क ः डिजिटल इंडिया -2022 पुरस्कारांमध्ये कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या ई-नाम या पथदर्शी उपक्रमाला नागरिकांचे सक्षमीकरण करण्याच्या श्रेणीत प्लॅटिनम (प्रथम) पुरस्कार मिळाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे डिजिटल इंडिया पुरस्कार देण्यात आले. कृषी मंत्रालयाच्या सहसचिव, डॉ. एन. विजया लक्ष्मी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री, अश्विनी वैष्णव आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
ई-नाम हा एक डिजिटल प्लॅटफॉर्म असून, त्यात 22 राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशातील 1260 कृषी उत्पन्न बाजार समित्या एकत्रित आणण्यात आल्या आहेत. ज्यावर 203 कृषी आणि बागायती वस्तूंचा ऑनलाईन व्यापार केला जाऊ शकतो. यावर शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनांची वाजवी किंमत मिळू शकते. ई-नाम व्यवस्था बाजार समित्यांच्या डिजिटल परिवर्तनाची आणि कृषी उत्पादनांच्या ई-व्यापाराची व्यवस्था करणारा एक डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. 31 डिसेंबर 2022 पर्यंत, ई नाम पोर्टलवर 1.74 कोटी शेतकरी आणि 2.39 लाख व्यापाऱ्यांनी ई-नाम पोर्टलवर नोंदणी केली आहे. आतापर्यंत ई-नाम पोर्टलवरून 69 दशलक्ष मेट्रिक टन उत्पादनांचा 2.42 लाख कोटी रुपयांचा व्यापार झाला आहे.
मोबाइल अॅपवर प्रचलित वस्तूंच्या किमती, 100 किलोमीटरच्या परिघात ई-एनएएम मंडई आणि मंडईतील किमती जीपीएसद्वारे माहिती, मार्गाविषयी माहिती, मोठी आगावू नोंदणी, लिलावातील अंतिम किमतीची माहिती देण्यासाठी एसएमएस अलर्ट, पेमेंट पावती, ई-नामच्या रियल टाईम स्पर्धात्मक किमती, अचूक वजनासाठी वजनाचे एकत्रीकरण, मोबाइलवर उपलब्ध बोलीची प्रगती, शेतकरी आणि व्यापारी यांच्यातील थेट व्यापार, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पेमेंट, खरेदीदार आणि विक्रेत्याच्या व्यवहार खर्चात कपात, एफपीओला ई-व्यापार करण्यासाठी एफपीओ ट्रेडिंग मॉड्युल इत्यादी फायदे/सुविधा ई-नाम शेतकरी आणि इतर भागधारकांना विविध पुरवत आहे.
डिजिटल प्रशासनाच्या क्षेत्रात विविध सरकारी संस्थांद्वारे अभिनव डिजिटल समाधान/अनुकरणीय उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि सन्मानित करण्यासाठी, इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारे डिजिटल इंडिया पुरस्कार प्रदान केले जातात. डिजिटल इंडिया पुरस्कार- 2022 चे उद्दिष्ट केवळ सरकारी संस्थांनाच नव्हे तर स्टार्टअप्सना डिजिटल इंडियाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रेरणा देणे हे आहे.
सात विविध श्रेणींमध्ये डिजिटल इंडिया अवॉर्ड 2022 देण्यात आले आहेत. यात, नागरिकांचे डिजिटल सक्षमीकरण, सार्वजनिक डिजिटल प्लॅटफॉर्म, स्टार्ट-अप्सच्या सहकार्याने डिजिटल पुढाकार, व्यवसाय करणे सुलभ करण्यासाठी डिजिटल पुढाकार, सामाजिक आर्थिक विकासासाठी डेटा शेअरिंग आणि वापर, तळागाळातील जनतेसाठी डिजिटल उपक्रम, सर्वोत्तम वेब आणि मोबाइल उपक्रम इत्यादी श्रेणीत, प्लॅटिनम, सुवर्ण आणि रौप्य अशा विविध गटांतर्गत विजेत्या संघांना पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत