एटीएम न्यूज नेटवर्क ः अॅडव्हांटा आणि नेचर डॉट फार्म कंपनीदरम्यान पोषण आहार उगवण योजना सुरू करण्यासाठी सहकार्य करार करण्यात आला आहे. ही योजना खऱ्या अर्थाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना एक मार्गदर्शक असल्याचा विश्वास कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या संकटकाळात या योजनेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे.
हिरव्या चाऱ्याचे उत्पादन अयशस्वी झाल्यास ही योजना दूध उत्पादक शेतकऱ्यांना संकटकाळात पाय रोवून ठेवण्यास मदत करते. पेरणीच्या 15 दिवसांच्या आत बियाणे उगवले नाही, तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाते. चारा पिकांमध्ये ज्वारी, तृणधान्ये आणि मका यांचा समावेश होतो. या पिकांची अंकुर फुटण्याची प्रक्रिया अयशस्वी झाल्यास शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. या अशा प्रकारे ही योजना आवश्यक मदत करते.
अॅडव्हांटा एन्टरप्रायजेस लिमिटेडचे आशिया, आफ्रिका आणि आंतरराष्ट्रीय भाजीपाला विभागाचे प्रादेशिक प्रमुख प्रशांत बेलगमवार म्हणाले, “आम्ही उपलब्ध करून देत असलेल्या संकरित पोषण आहाराने हिरव्या चाऱ्यासाठी एक मापदंड प्रस्थापित केला आहे. प्रचंड उत्पादन क्षमतेमुळे शेतकऱ्यांना या संकरित चार्याची नियमित उपलब्धता सुनिश्चित करता येते. चाऱ्यावर कीड आणि रोगांचा अतिशय कमी होणारा प्रादुर्भाव तसेच उच्च प्रथिनेयुक्त, पचनक्षमता ही या चाऱ्याची वैशिष्ट्ये आहेत. शिवाय दुधाचे उच्च उत्पादन आणि शेवटी शेतकऱ्यांना होणारा नफा, यामुळे या संकरित चाऱ्याची मागणी वाढली आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे जर बियाणांना अंकुर फुटू शकले नाही, तर त्यांना आर्थिक सहाय्य केले जाईल. अशाप्रकारे दूध उत्पादक शेतकरी आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकतो आणि त्याच्या दुग्धव्यवसायात प्रगती करू शकतो, असेही बेलगमवार म्हणाले.
नेचर डॉट फार्मचे विमा विभागाचे प्रमुख विवेक लालन म्हणाले, "जगातील पशुधनाच्या अंदाजे २० टक्के लोकसंख्येची पूर्तता भारत करतो. भारतातील संपूर्ण लागवडीयोग्य जमिनीपैकी ५ टक्क्यांपेक्षा कमी जमिनीवर चारा पिके घेतली जातात. प्रतिकूल हवामानामुळे होणाऱ्या नुकसानीपासून मदत करणे, ही पोषण आहार अंकुरण योजनेमागील संकल्पना आहे. चारा पिके जमिनीची धूप रोखतात, सेंद्रिय कार्बनचे प्रमाण वाढवतात. जमिनीला नायट्रोजन परत देतात आणि जमिनीची सुपीकता वाढवतात. सामान्यतः चारा पिके पीक फिरण्यासाठी आणि पशुधनासाठी चारा म्हणून वापरली जातात. चारा पिके हा प्राण्यांच्या पोषण व्यवस्थापनाचा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे चारा पिकाची उगवण करणे आणि उगवण अयशस्वी झाल्यास शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.''