एटीएम न्यूज नेटवर्क : जळगाव जिल्हा हा प्रमुख केळी उत्पादकांपैकी एक असून या परिसरात बडवाणी, बऱ्हाणपूर, नंदुरबार, धुळे, सुरत, नर्मदानगर आदी जिल्ह्यातील केळी उत्पादकांवर आधारित अर्थव्यवस्था मोठी आहे. यातून ग्रामीण भागात मोठा रोजगार निर्माण होतो; त्यादृष्टीने देशातील प्रमुख बनाना क्लस्टरपैकी जळगाव जिल्ह्यातही बनाना क्लस्टर असावे यासाठी विशेष अहवाल तयार करुन स्वत: कें द्र सरकारकडे पाठपुरावा करू’ असे आश्वासन अपेडाचे अध्यक्ष अभिषेक देव यांनी दिले.
एग्रीकल्चर प्रोसेस फूड प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट एथोरिटी (अपेडा) व जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. तर्फे कस्तुरबा सभागृह येथे आयोजित ‘बनाना ग्रोवर्स एण्ड एक्सपोटर्स मीट २०२४-२५’ मध्ये प्रमुख अतिथी म्हणून अभिषेक देव बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, अपेडाचे व्यवस्थापक विनिता सुधांशू, महाराष्ट्र अपेडाचे प्रशांत वाघमारे, केळी उत्पादक संघाचे वसंत महाजन, अमोल जावळे, केळी निर्यातदार आशिष अग्रवाल, किरण ढोके, केळी तज्ज्ञ डॉ. के. बी. पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.
केळीची निर्यात व पायाभूत सुविधांसह फ्रुट केअर मॅनेजमेंटसाठी शेतकऱ्यांचे प्रशिक्षण, पॅक हाऊस, कोल्डस्टोअरेज, शेतातून पॅकहाऊसपर्यंत सुरक्षीत, जलद व कमी किंमतीत वाहतूक सुविधा निर्माण करणे, याबाबतची महत्त्वपूर्ण चर्चा जैन हिल्स येथे झालेल्या अपेडा केळी उत्पादक व निर्यातदार यांच्यासमवेत बैठकीत झाली.
अपेडाचे अध्यक्ष अभिषेक देव बोलताना पुढे म्हणाले की, ‘आपण शेतात उत्पादन करतो, ते गुणवत्तापूर्ण आहे का? त्यासाठी काय केले पाहिजे, आपण काय खातोय ते कुठून उत्पादन झाले आहे हे खाणाऱ्याला समजले पाहिजे. ग्लोबल गॅप, जैन गॅप तंत्रज्ञान त्यासाठी उपयुक्त ठरू पहात आहे. फ्रुट केअर मॅनेजमेंट, क्लिनींग, उत्पादनक्षमता वाढविणे, आंतरराष्ट्रीय मानांकनप्रमाणे निर्यातक्षम के ळी उत्पादनासाठी प्रयत्न करणे, ज्या असेट आहेत त्या पुर्ण क्षमतेने उपयोग करणे. जैन इरिगेशन ही केळी उत्पादकांसह फळ-भाजीपाला निर्यात करू पाहणाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण असेट आहे.
जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, ‘वडील भवरलालजी जैन यांनी गांधी तीर्थ निर्माण केले गांधीजींनी ग्रामीण भारतात भविष्य बघितले. गांधीजींच्या या विचारांचा माझ्या वडिलांवर प्रभाव राहिला आहे. ‘ग्रामीण विकास घडला तर भारत विकास साध्य करेल’ हे त्यांचे विचार जैन इरिगेशन आपल्या कृतीतून साध्य करित आहे. यामुळे निर्यातक्षम केळी उत्पादन होऊ लागली. प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. के.बी.पाटील यांनी केले.