एटीएम न्यूज नेटवर्क : आंध्रप्रदेशात आठ वर्षांहून अधिक काळ वापरल्या जाणाऱ्या अनोख्या नैसर्गिक शेती पद्धतीला जागतिक मान्यता मिळाली आहे. आंध्र प्रदेशातील दुष्काळग्रस्त अनंतपूर जिल्ह्यातील शेतकरी नागेंद्रम्मा नेटटेम, राज्य सरकारी संस्थेचे रिथू अधिकारा, संस्थेचे कार्यकारी उपाध्यक्ष विजय कुमार यांना नुकताच लिस्बन (पोर्तुगाल) येथे प्रतिष्ठित गुलबेंकियन मानवता पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराचे मूल्य १ दशलक्ष डॉलर एवढे आहे.
घंटापुरम गावातील एक लहान शेतकरी नागेंद्रम्मा यांच्यासाठी नैसर्गिक शेतीकडे वळणे ही कल्पनारम्य गोष्ट होती. दृष्टीच्या कमतरतेने ग्रस्त असलेल्या नागेंद्रम्माच्या मुलीला नैसर्गिक शेतीचे महत्व कळले आणि ती रासायनिक शेतीपासून दूर राहिली. नैसर्गिक शेती करून तिने गावातील सहकारी शेतकऱ्यांच्या सरासरी उत्पन्नाच्या ५० टक्क्यांहून अधिक कमाई केली. त्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिले नाही.
राज्य सरकारने प्रोत्साहन दिलेल्या नैसर्गिक शेतीच्या पध्दतींची ती पुरस्कर्ती बनली. २०१९ मध्ये ती आंध्रप्रदेश समुदाय व्यवस्थापित नैसर्गिक शेती (एपीसीएनएफ) ची प्रशिक्षक बनली. अधिकाधिक शेतकऱ्यांना तिने नैसर्गिक शेतीचे महत्व समजावले.२०२३ मध्ये ती एक मॉडेल मास्टर ट्रेनर बनली.तिने संपूर्ण जिल्ह्यातील इतर प्रशिक्षकांना मार्गदर्शन केले.
“एपीसीएनएफ कार्यक्रम २०१६ मध्ये सुरू करण्यात आला.“एपीसीएनएफ' संस्था लहान शेतकऱ्यांना रासायनिक सघन शेतीपासून नैसर्गिक शेतीकडे जाण्यासाठी मदत करते. यामध्ये सेंद्रिय अवशेष वापरणे आणि मातीचे आरोग्य सुधारण्यासाठी मशागत कमी करणे, देशी बियाणांचा वापर करणे यासारख्या पद्धतींचा समावेश आहे. या कार्यक्रमाने मातीतील कार्बन वाढवून जमिनीचा ऱ्हास पूर्ववत करून मातीचे तापमान कमी करून आणि जैवविविधतेला प्रोत्साहन देऊन पर्यावरण संवर्धनासाठी योगदान दिले आहे.
“एपीसीएनएफ संस्थेत राज्यात ५ लाख हेक्टर एकूण जमीन असलेल्या १० लाखांहून अधिक लहान शेतकऱ्यांचा समावेश आहे. या तिघांची निवड १८१ नामांकनांमधून करण्यात आली. कला, धर्मादाय, विज्ञान आणि शिक्षण या विभागाद्वारे प्रत्येकासाठी जीवनाचा दर्जा वाढवणारी परोपकारी संस्था गुलबेंकियन फाउंडेशनद्वारे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.