SUBSCRIBE E-Paper
English मराठी
AGRI NEWS

कृषीथॉन मध्ये 28 नोव्हेंबर रोजी ‘हायटेक नर्सरी’ या विषयावर विशेष चर्चासत्र

Nov 19, 2026
News Image

नाशिक : बदलते हवामान, बाजारपेठेतील बदल आणि दिवसेंदिवस घटणारे जलस्रोत यामुळे शेतीसमोर अनेक आव्हाने निर्माण होत आहेत. या परिस्थितीत कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्यासाठी आणि पिकांची योग्य वाढ होण्यासाठी आधुनिक शेती तंत्रज्ञानासोबतच दर्जेदार व रोगमुक्त रोपांची निवड अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर कृषीथॉन २०२६ अंतर्गत कृषी मंथन विशेष चर्चासत्रात ‘हायटेक नर्सरी : शाश्वत शेतीचा पाया, शेतकऱ्यांच्या प्रगतीची नवी दिशा!’ या विषयावर विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवार, दि. २८ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी २.०० वाजता कृषीथॉन २०२६, माडसांगवी, शिलापूर टोलनाका जवळ, संभाजीनगर रोड, नाशिक येथे हा परिसंवाद होणार आहे. रोपांची मागणी, बाजारपेठेतील बदल, आधुनिक उत्पादन तंत्रज्ञान, गुणवत्ता आणि भविष्यातील व्यावसायिक संधी अशा विविध पैलूंवर या चर्चासत्रात तज्ज्ञांकडून सखोल मार्गदर्शन मिळणार आहे.

या परिसंवादात बायर सेमिनीजचे विक्री प्रमुख (महाराष्ट्र) ज्ञानेश्वर पालकर, ओम गायत्री ग्रुपचे संस्थापक मधुकर गवळी, नाशिकस् बालाजी नर्सरीचे सह-संस्थापक माधव पाचोरकर, वीरगाव येथील विश्व हायटेक नर्सरीचे वीरेंद्र थोरात, के. के. वाघ कृषी महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक तुषार उगले आणि आयआयएलचे रिजनल मॅनेजर प्रतीक मोरे हे मान्यवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. तसेच, फ्रुटवाला बागायतदार प्रा. लि. चे संचालक गणेश नाझीरकर हे या सर्व वक्त्यांशी संवाद साधणार आहेत.

आधुनिक नर्सरी तंत्रज्ञान, गुणवत्तेचे निकष आणि बाजारपेठेतील संधी यांचा अचूक अभ्यास मांडणारा हा परिसंवाद शेतकरी, रोपवाटिका चालक आणि कृषी क्षेत्रातील अभ्यासकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या चर्चासत्राचा शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन कृषीथॉनच्या आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

स्थळ : कृषीथॉन २०२६, माडसांगवी, शिलापूर टोलनाका जवळ, संभाजीनगर रोड, नाशिक.