नाशिक : बदलते हवामान, अनियमित पाऊस, दुष्काळसदृश परिस्थिती आणि मर्यादित जलस्रोत यांचा डाळिंब शेतीवर होणारा परिणाम लक्षात घेता, डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसमोर उत्पादनाचे सातत्य टिकविण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर डाळिंब उत्पादकांना योग्य पीक व्यवस्थापन, आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि बदलत्या परिस्थितीनुसार शेतीचे नियोजन याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कृषीथॉन २०२६ मध्ये 'बदलत्या हवामानात डाळिंब शेतीचे नियोजन आणि नवीदिशा!' या विषयावर विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार, दि. २७ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजता माडसांगवी, नाशिक येथे होणाऱ्या या चर्चासत्रात डाळिंब शेतीतील अनुभवी मार्गदर्शक डाळिंबरत्न बाबासाहेब गोरे हे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
बदलत्या हवामानात डाळिंब बागांचे व्यवस्थापन, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर, मर्यादित जलस्रोतांमध्ये पीक नियोजन, प्रतिकूल परिस्थितीत बागांची काळजी आणि उत्पादनाची गुणवत्ता टिकविण्यासाठी आवश्यक उपाययोजना अशा महत्त्वपूर्ण विषयांवर या चर्चासत्रात विचारमंथन होणार आहे.
सध्याच्या परिस्थितीत पारंपरिक शेती पद्धतींसोबतच बदलत्या हवामानाला अनुरूप तंत्रज्ञान आणि योग्य व्यवस्थापन पद्धती स्वीकारणे आवश्यक आहे. डाळिंब उत्पादकांना प्रत्यक्ष शेतीतील अनुभवातून मार्गदर्शन मिळावे, तसेच भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नवी दिशा मिळावी, हाया चर्चासत्राचा मुख्यउद्देश आहे.
'आव्हानांवर मात करूया... डाळिंब शेती अधिक सक्षम करूया!' या संकल्पनेतून आयोजित या चर्चासत्राचा डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन कृषीथॉनच्या आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.