SUBSCRIBE E-Paper
English मराठी
AGRI NEWS

कृषीथॉन २०२६ मध्ये ‘जलमंथन’चर्चासत्राचे आयोजन - हवामान बदल, मर्यादित जलस्रोत आणि सिंचन व्यवस्थापनावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

Nov 19, 2026
News Image

नाशिक : शेती आणि पाणी यांचे नाते अतूट आहे. मात्र, बदलते हवामान, पावसाचे अनिश्चित वेळापत्रक, भूजल पातळीतील घट आणि सिंचनासाठी उपलब्ध पाण्यावरील वाढता ताण यामुळे शेतीसमोर अनेक आव्हाने निर्माण होत आहेत. या परिस्थितीत उपलब्ध जलस्रोतांचे योग्य नियोजन, पाण्याचा काटेकोर वापर आणि शाश्वत जलव्यवस्थापन ही काळाची गरज बनली आहे. याच पार्श्वभूमीवर कृषीथॉन २०२६ मध्ये ‘जलमंथन’ या संकल्पने अंतर्गत विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवार, दि. २७ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता माडसांगवी, शिलापूर टोलनाका जवळ, संभाजीनगर रोड, नाशिक येथे हे चर्चासत्र होणार आहे. हवामान बदलाचे शेतीवरील परिणाम समजून घेण्यासोबतच पाण्याचे संवर्धन, भूजल पुनर्भरण आणि सामूहिक सिंचन व्यवस्थापनाच्या माध्यमातून शेती अधिक शाश्वत करण्यासाठी उपयुक्त मार्गदर्शन या चर्चासत्रात मिळणार आहे.

या चर्चासत्रात ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे हे 'एल-निनो : परिणाम, भारतीय मान्सून आणि शेती पुढील आव्हाने' या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. एल-निनोची संकल्पना, हवामानातील बदल आणि त्याचापावसाच्या पद्धतीवर होणारा संभाव्य परिणाम याविषयी ते सविस्तर माहिती देणार आहेत.

तसेच, 'जलतारा' प्रकल्पाचे जनक प्रा. डॉ. पुरुषोत्तम वायाळ हे 'जलतारा : भूजल पुनर्भरणासाठी सोपा आणिशाश्वत उपाय' या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. भूजल पातळी वाढविण्यासाठी स्थानिक पातळीवर राबविता येणारे उपाय आणि जलसंधारणाचे महत्त्व ते स्पष्ट करणार आहेत.

याशिवाय, वाघाड प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शहाजी सोमवंशी हे 'शेतकरी सहभागी पाणी वापर संस्थांच्या माध्यमातून सिंचनाचे नियोजन' याविषयावर मार्गदर्शन करणार आहेत. शेतकऱ्यांचा सामूहिक सहभाग, उपलब्ध पाण्याचे समन्यायी वाटप आणि नियोजनबद्ध सिंचन व्यवस्थापन यांचे महत्त्व ते विशद करणार आहेत.

हवामानाचा अचूक वेध, पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्वआणि सामूहिक सहभागातूनजलसंपत्तीचे संवर्धन या तीनमहत्त्वपूर्ण बाबींवर आधारित हेचर्चासत्र शेतकरी, कृषी उद्योजक, पाणी वापर संस्थांचेप्रतिनिधी आणि कृषीक्षेत्रातील अभ्यासकांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

'पाण्याचे नियोजन, शेतीचे संवर्धन आणि समृद्ध भविष्याचा वेध' या उद्देशाने आयोजित या 'जलमंथन' चर्चासत्रात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कृषीथॉनच्या आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.