'कृषिथॉन 2026' प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभाला कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची विशेष उपस्थिती - Agri Trade Media
SUBSCRIBE E-Paper
English मराठी
AGRI NEWS

'कृषिथॉन 2026' प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभाला कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची विशेष उपस्थिती

Nov 03, 2026
News Image

नाशिक: शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, नवकल्पना आणि संशोधनाचा संगम ठरणारे ‘कृषीथॉन २०२६’ (Krishithon)हे आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन (Agri Exhibition)येत्या २६ ते ३० नोव्हेंबर २०२६ दरम्यान नाशिकच्या (Nashik) माडसांगवी (Madsangavi) मध्ये आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे (Agriculture Minister Dattatray Bharane) उपस्थित राहणार आहेत आणि शेतकरी बांधवांना नवीन कृषी तंत्रज्ञान तथा शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती कृषीथॉनचे आयोजक संजय न्याहारकर यांनी दिली.

प्रदर्शनाचे सहआयोजक साहिल न्याहारकर यांनी नुकतीच कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन कार्यक्रमाचे औपचारिक निमंत्रण दिले. त्या भेटीत मंत्री भरणे यांनी कृषीथॉनद्वारे शेतकऱ्यांपर्यंत (Farmers) अत्याधुनिक तंत्रज्ञान (Technology) पोहोचविण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे कौतुक केले आणि या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा दिल्या.

ह्युमन सर्व्हिस फाउंडेशन आणि मीडिया एक्झिबिटर्स प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या प्रदर्शनाची १९ वी आवृत्ती नाशिक येथील माडसांगवी (शिलापूर टोल नाक्याजवळ, छत्रपती संभाजीनगर रोड, नाशिक) येथे पार पडणार आहे. यंदाच्या प्रदर्शनात देश-विदेशातील ३०० हून अधिक कृषी कंपन्या, संशोधन संस्था आणि स्टार्टअप्स (Start ups) सहभागी होणार असून १.२५ लाखांहून अधिक शेतकरी, उद्योजक आणि संशोधक या प्रदर्शनाला भेट देतील असा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला आहे.

यंदा राज्यात असलेल्या दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शनात कमी पाण्यात पिकांचे संगोपन, सूक्ष्म सिंचन आणि जलव्यवस्थापनाबाबत विशेष 'चर्चासत्रे' आयोजित केली जाणार आहेत. या तांत्रिक सत्रांद्वारे कृषी तज्ज्ञ शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करतील. पाच दिवस चालणाऱ्या या भव्य प्रदर्शनात अत्याधुनिक शेती यंत्रसामग्री, ड्रोन प्रात्यक्षिके, सेंद्रिय शेती आणि स्मार्ट सिंचन प्रणालीचे प्रदर्शन होणार असून हे आयोजन शेतकऱ्यांसाठी अत्यंत मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

News Image 3