'मुरासू' चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पावसाची अन् ढगाळ हवामानाची शक्यता - Agri Trade Media
SUBSCRIBE E-Paper
English मराठी
AGRI NEWS

'मुरासू' चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात पावसाची अन् ढगाळ हवामानाची शक्यता

Nov 02, 2026
News Image

एटीएम न्यूज (नाशिक) : बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) तीव्र कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे 'मुरासू' चक्रीवादळाची (Murasu Cyclone) निर्मिती झाली असून हे वादळ वेगाने वायव्य दिशेने सरकत आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ३ नोव्हेंबर रोजी हे चक्रीवादळ दक्षिण आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. या हवामान प्रणालीमुळे पूर्व किनारपट्टीवरील राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होऊ शकतो. या वादळाचा मुख्य प्रभाव आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या भागांवर असला, तरी त्याच्या अप्रत्यक्ष प्रभावामुळे महाराष्ट्रातील (Maharashtra) हवामानातही महत्त्वपूर्ण बदल दिसून येत आहेत.

राज्यातील कोकण (Konkan), मध्य महाराष्ट्र, मराठवाडा (Marathwada) आणि पूर्व विदर्भातील (Vidarbha) काही जिल्ह्यांमध्ये ५ नोव्हेंबरपर्यंत ढगाळ वातावरण राहून विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई (Mumbai), पुणे (Pune), नाशिक (Nashik) आणि लगतच्या भागात संध्याकाळच्या वेळी अचानक ढग जमा होऊन स्थानिक पातळीवर पाऊस पडत असल्याच्या नोंदी समोर आल्या आहेत. वादळामुळे निर्माण झालेल्या या अनपेक्षित हवामानामुळे शेतीकामांवर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर कृषी तज्ज्ञांनी (Agricultural Expert) शेतकऱ्यांना (Farmers) खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. काढणीला आलेला कापूस (Cotton) व इतर पिके त्वरित सुरक्षित ठिकाणी साठवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच ढगाळ हवामानामुळे द्राक्ष (Grapes) बागांवर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून वेळेवर योग्य फवारणी आणि निगा राखणे गरजेचे आहे. जमिनीत ओलावा योग्य असल्यास हरभरा आणि रब्बी ज्वारीची पेरणी १५ नोव्हेंबरपूर्वी पूर्ण करून घेण्याच्या सूचना कृषी विभागाने दिल्या आहेत.

News Image 2

दरम्यान, आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या (Orisa) किनारपट्टीवर ताशी १०० ते १२० किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज असल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर थेट धोका नसला तरी समुद्रात काही प्रमाणात लाटांचा वेग वाढलेला पाहायला मिळू शकतो. या वादळाच्या पुढील प्रवासावर आणि तीव्रतेवर हवामान विभाग बारीक लक्ष ठेवून असून, नागरिकांनी व शेतकऱ्यांनी अधिकृत हवामान अंदाजांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.